माथेरानच्या विकासाकडे पर्यावरणमंत्र्यांचे विशेष लक्ष, रोडमॅप बनविण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:37 AM2020-10-29T00:37:30+5:302020-10-29T00:38:32+5:30
Aditya Thackeray News : विधानसभेत प्रवेश करण्याआधी माथेरानमध्ये आलेले राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सलग दुसऱ्यांदा माथेरानसाठी खास बैठक घेऊन विविध पर्यावरणस्नेही उपक्रमांना शासनाकडून पाठिंबा दिला आहे.
कर्जत /माथेरान : माथेरानच्या विकासाचा रोडमॅप बनविण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. पर्यावरणमंत्र्यांच्या सूचनेने झालेल्या विशेष बैठकीत माथेरानचे ब्रँडिंग, स्थानिकांना रोजगार आणि माथेरानचे नाव अबाधित राखण्यासाठी सर्व करण्याचे आश्वासन या बैठकीत पर्यावरणमंत्र्यांनी दिले.
विधानसभेत प्रवेश करण्याआधी माथेरानमध्ये आलेले राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सलग दुसऱ्यांदा माथेरानसाठी खास बैठक घेऊन विविध पर्यावरणस्नेही उपक्रमांना शासनाकडून पाठिंबा दिला आहे. पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी माथेरानमधील पर्यटनवाढीसाठी आवश्यक योजना राबविण्यासाठी पर्यावरणमंत्र्यांकडून विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या बैठकीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, राज्याच्या पर्यावरण सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास आणि पर्यटन विभागाचे सचिव, एमएमआरडीएचे आयुक्त आर.राजीव, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला माथेरान नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी पीपीई सादरीकरण केले. त्यात माथेरानची भौगोलिक परिस्थितीचा आढावा देऊन पर्यावरणाचा समतोल सांभाळून पर्यटनास चालना देणे. पर्यावरण पूरक विकास करणे शक्य असून, स्थानिकांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे. परिवहन सेवेबाबत माहिती दिली. माथेरानला पर्यटनाचा विशेष दर्जा देण्यात यावा, याचीही मागणी करण्यात आली. त्याच वेळी माथेरान सनियंत्रण समिती आणि त्याबाबतीत असलेल्या अडचणी, माथेरानची प्रसिद्धी (ब्रँडिंग) एमटीडीसीमार्फत करण्यात यावी, याचाही आग्रह धरण्यात आला.
पर्यटन, पर्यावरण आणि स्थानिकांना रोजगार यांचा विचार करून माथेरानची ओळख ही ‘माथेरान’ म्हणून अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी माथेरानच्या विकासाचा रोडमॅप बनविण्याचे आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर विशेष प्रेम असलेल्या या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात योजना शासन राबविणार आहे. त्यातील अनेक पर्यावरणस्नेही आणि पायाभूत सुविधांच्या योजना राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. यापूर्वीही माथेरानसाठी भरीव निधी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन जाहीर केला होता.
बॅटरीवर चालणारी गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न
बैठकीत भूस्खलन, वन विभागाच्या परिसराला फेसिंग, झाडांचे सर्वेक्षण, व्हॅली क्रॉसिंग / साहसी खेळांना परवानगी, वाहतूक आणि मालवाहतूक समस्या, पर्यायी मार्ग रोप वे या विविध विषयांवर चर्चा झाली. स्पोर्ट्स टुरिझमसाठीही प्रयत्न केले जातील, असे पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी सांगितले, तर बॅटरीवर चालणारी गाडी सुरू करण्यासाठी घोडेवाल्यांना विश्वासात घेणे जरूरीचे आहे. पालिकेने तशी बोलणी सुरू करावीत, असे सूचित केले.