कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी विशेष कॅम्प - अजित गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:26 AM2017-10-31T04:26:48+5:302017-10-31T04:27:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे.
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे. कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी हा विशेष कॅम्प अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
याआधीच एका कुपोषित बालकावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कायस्वरूपी बालरोग तज्ज्ञ देण्याची मागणी सरकार दरबारी केली असल्याचेही डॉ.गवळी यांनी स्पष्ट केले.
सकाळपासूनच कॅम्पला सुरु वात होणार आहे. कुपोषित बालकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सरकार कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजनांसाठी कोट्यवधी रु पये खर्च करीत असताना देखील कुपोषित बालके आढळण्याचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे प्रशासन आणि सरकार यामध्ये कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आठ दिवसांपूर्वी कुपोषणाने एका बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी काही स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र ते बालक कुपोषणाने मरण पावले नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. त्यातच एका कुपोषित बालकाला २९ आॅक्टोबरला जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कुपोषित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कर्जत तालुक्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.
अलिबाग येथे होणाºया कॅम्पसाठी कर्जत तालुक्यातून सुमारे ३० बालकांना उपचारासाठी आणले जाणार आहे.
तेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाणार आहे.
किमान १४ दिवसांकरिता त्यांना उपचार, पोषण आहार द्यावा लागतो.
मात्र आदिवासी समाजातील व्यक्ती पूर्ण वेळ उपचारासाठी थांबत नसल्याची खंत डॉ.गवळी यांनी व्यक्त केली.
एक वर्षाच्या बालकाला किमान ९००-१००० कॅलरी रोजचा आहार मिळणे आवश्यक आहे. त्यांना तो मिळत नसल्याने बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकली जातात. बालकांचा पोषण आहार महत्त्वपूर्ण असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.