विशेष मुलांनी साकारल्या दोन लाख पणत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:35 PM2018-10-31T23:35:29+5:302018-10-31T23:35:51+5:30
पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत.
- जयंत धुळप
अलिबाग : पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत.
विशेष मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊ न त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या आई डे केअर शाळेच्या माध्यमातून केले जात आहे. या पणत्या पेण बाजारपेठेतील लक्ष्मी नारायण मंदिर, अलिशान सुपर मार्केट, अॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास प्रारंभ झाला असून, पेणकर ग्राहक एका आगळ््या संवेदनशीलतेसह अभिमानाने या विशेष मुलांनी तयार केलेल्या पणत्या व विविध आकाराचे दिवे खरेदी करीत आहेत.
विविध सणांदरम्यान मुलांनी केलेल्या कलाकृती अमेरिका आणि दुबईला देखील पोहोचल्याचे मोहिते यांनी सांगितले. यावेळीही पणत्या पाठवल्या आहेत. विशेष मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी स्वावलंबी होऊन आपल्या पायावर उभे राहाण्याकरिताच्या या प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी ग्राहकांनी या मुलांनी केलेल्या वस्तंूची खरेदी करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
पाठबळाची गरज
या मुलांना शाळेतील प्रशिक्षक हे व्यावसायिक प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण घेऊन शाळेतील ४७ विशेष मुलांनी पणत्या व विविध दिवे तयार केले आहेत. तर १६ विशेष मुलांना त्यांनी तयार केलेल्या कामाचे मानधनदेखील घेत आहेत. प्राप्त मानधन आपल्या पालकांकडे सुपूर्द केल्यावर पालकांना आनंद वाटून आपल्या विशेष मुलांबद्दल आदर निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याचे शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते यांनी सांगितले.