मुरुड, श्रीवर्धनला विशेष पर्यटनाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:38 PM2020-02-14T23:38:25+5:302020-02-14T23:38:30+5:30
पर्यटनवृद्धीसाठी प्रस्तावाला गती देण्याचे आदेश : खारभूमीच्या चुकीच्या नोंदी काढण्याचे राज्यमंत्र्यांचे निर्देश
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुरुड तालुक्याचे विशेष आकर्षण पर्यटकांना नेहमीच राहिलेले आहे. येथील काही जमिनींवर खारभूमी लाभक्षेत्र असा शिक्का मारल्याने विकासाला मारक ठरत होते. त्यांच्या जमिनीवरील नोंदी काढून टाकण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुन्नरला देण्यात आलेल्या विशेष पर्यटनाच्या धर्तीवर मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याचाही समावेश करण्यासाठी प्रस्तावाला गती द्यावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीला एक्स्ट्रा मायलेज मिळणार आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. जिल्ह्यामध्ये पर्यटनवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. मात्र, काही नियम, कायदे आडवे येत असल्याने तेथील पर्यटनस्थळांचा विकास करणे शक्य होत नाही. विकासात्मक कामे करण्यावर बंधने येत असल्याने पर्यटन आणि त्या अनुषंगाने अन्य विकासाला ब्रेक लागत होता.
मुरुड शहर हे पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित असताना, जमिनीच्या सात-बारा उताºयावर इतर हक्काच्या अधिकारामध्ये खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट अशी नोंद करण्यात आली आहे. या नोंदी रद्द केल्यास येथील नागरिकांना पर्यटन व्यवसाय वृद्धी करणे सोपे जाणार आहे. ज्या जमिनी खारभूमी क्षेत्रातील आहेत, त्या वगळून इतर जमिनीवरील या चुकीच्या नोंदी रद्द झाल्यास येथील पर्यटन विकासाला गती येणार आहे. याच कारणासाठी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयामध्ये याच विषयावर गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.
या प्रसंगी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर, सहायक संचालक रवींद्र पवार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता सं. निरमनवार, उत्तर कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्र. बा. मिसाळ, खारभूमी विभाग, पर्यटन विभाग, एमटीडीसी अधिकारी उपस्थित होते.
श्रीवर्धनमधील शेतजमिनी वनेतर वापरास बंदी
1श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वनेतर वापरास बंदी आहे. अशा शेतकºयांच्या जमिनीची माहिती घेऊन त्यांना त्या जमिनी, मिळकती विक्र ीसाठी सरकारची परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असेही तटकरे यांनी आदेश दिले. मुरुड-जंजिरा येथे अनेक वर्षांपासून गाइड म्हणून कार्यरत असलेल्या स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना मान्यता देण्यात यावी. तेथील जलवाहतुकीस परवानगी मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी. जुन्नरला विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे.
2याच धर्तीवर श्रीवर्धन आणि
मुरुड तालुक्यासह जिल्ह्यातील विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाहीस गती द्यावी, जंजिरा पद्मदुर्ग तसेच दिवेआगार येथे जेट्टी उभारावी, कासू-गडब विभागातील खारभूमी योजनेअंतर्गत बंदिस्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशाही सूचना राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.