नागोठणे रेल्वे स्थानकाला पुन्हा विशेष गाड्यांचा ठेंगा
By admin | Published: August 22, 2015 09:43 PM2015-08-22T21:43:53+5:302015-08-22T21:43:53+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर
नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर थेट रोहे स्थानकावर थांबणार असल्याने पेण आणि नागोठणे यातून वगळल्याबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधित गाडीला नागोठणेत थांबा मिळण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे गणले जाते. मालगाडीद्वारे दर महिन्याला लाखो टन मालाची चढ-उतार या स्थानकातून केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाला त्यातून करोडो रु पयांचे उत्पन्न मिळत असते. या स्थानकातून दररोज पंचवीस ते तीस प्रवासी तसेच जलद गाड्या दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांकडे जात असल्या तरी यातील एकही गाडी स्थानकात थांबत नाही.
रोहा-दिवा, दादर-रत्नागिरी, सावंतवाडी - दिवा, दिवा - रोहा, दिवा - सावंतवाडी आणि रत्नागिरी - दादर या आठच प्रवासी गाड्या येथे थांबत असल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना पनवेल, रोहे किंवा माणगाव या स्थानकात उतरून नागोठणेत यावे लागत असते. दर महिन्याला साधारणत: पंधराशे प्रवाशांना हा द्राविडी प्राणायाम करायची वेळ येत असते.
नियमित नोकरीधंदा तसेच शिक्षणासाठी दररोज पनवेल, ठाणे, मुंबईकडे जाणारे पासधारक ही खंत बोलून दाखवत असले, तरी रेल्वेने पनवेल - चिपळूण गाडीला येथे थांबा न देता पुन्हा एकदा नागोठणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाली, खांब, आमडोशी, सांबरी, कोलेटी, रिलायन्स निवासी संकुल आदी भागातील अनेक गावांमधील शेकडो प्रवासी जा - ये करण्यासाठी नागोठणे स्थानकाचाच वापर करीत असतात. ही विशेष गाडी या स्थानकात थांबविली तर शेकडो प्रवाशांना त्याचा लाभ होणार असल्याने प्रवासीवर्गाचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
- १९८६ या मार्गावर वाहतूक चालू झाल्यानंतर एकतीस वर्षे उलटूनही नागोठणेतील प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असले, तरी आम्ही कितीही बोंबा मारूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र, कोणताही स्थानिक नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करतात.