दिव्यांगांच्या मतदानासाठी विशेष सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:08 PM2019-04-11T23:08:54+5:302019-04-11T23:09:01+5:30

विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांवर कें द्रावरने-आणची जबाबदारी; कुचराई केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कडक कारवाई

Special treatment for Divyanga voters | दिव्यांगांच्या मतदानासाठी विशेष सुविधा

दिव्यांगांच्या मतदानासाठी विशेष सुविधा

Next

जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी जे मतदान केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत, अशा दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वाहनांची व्यवस्था करावी, यामध्ये कुचराई केल्यास किंवा टाळाटाळ केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले आहेत.


याच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हाळदे यांनादेखील यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात येत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डॉ. सूर्यवंशी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार सनियंत्रण समितीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आदी उपस्थित होते.
प्रशासनाने दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरविल्या आहेत. ६७३ व्हीलचेअर्सची आवश्यकता असून, ४३४ व्हीलचेअर्स खरेदी करण्यात आल्या आहेत. १५ तालुक्यांतील ८०७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दिव्यांगांसाठी त्या उपयोगात आणल्या जातील. ज्यांना दिव्यांग मतदारांना आपल्या अपंगत्वामुळे स्वत: मतदान केंद्रावर येणे शक्य नाही, अशा दिव्यांग मतदारांना ग्रामसेवकांनी स्थानिक वाहने उपलब्ध करून द्यायची असून, २३ एप्रिल पूर्वी त्यांनी आपल्या गावांतील अशा दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन तशी नोंद करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी येणारा खर्च ग्रामपंचायत निधीतून करता येईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. दिव्यांगांना मतदान करता येईल आणि त्यांचे १०० टक्के मतदान होईल, असे पाहावे. विस्तार अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी असून याविषयी कोणतीही तक्र ार येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा या राष्ट्रीय कार्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले नाही म्हणून कडक कारवाई करण्यात येईल,असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.


मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल, असा मोठा दरवाजा या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांची असून या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या वेळी दिले. जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, हाशिवरे येथील अंधशिक्षक व समिती सदस्य अशोक अभंगे, प्रीझम सामाजिक संस्थेच्या तपस्वी गोंधळी यांनीदेखील या वेळी आपल्या सूचना मांडल्या.

एक दिव्यांग संचालित केंद्र असावे
च्भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे एक मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी संचालित असावे. दिव्यांग कर्मचारी शारीरिकदृष्ट्या इतरांपेक्षा काहीसे कमकुवत असले तरी प्रशासनात ते खूप चांगले आणि प्रभावी कार्यक्षमतेने काम करीत आहेत. शिवाय, महत्त्वाची जबाबदारीही सांभाळत आहेत, अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे एक मतदान केंद्र तरी दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संचालित असेल यादृष्टीने डॉ. सूर्यवंशी यांनी सूचना दिल्या.

Web Title: Special treatment for Divyanga voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.