खटला जलदगतीने चालवून आरोपींना फाशी द्या-दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:18 AM2020-07-29T00:18:02+5:302020-07-29T00:19:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रायगड/रोहा : राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. मात्र, याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड/रोहा : राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. मात्र, याचे सरकारला काहीच पडलेले नाही. रोहा येथील घटना लाजिरवाणी आणि चीड आणणारी आहे. गुन्हेगारांविरोधात जलदगती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी, २६ जुलै रोजी घडली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व स्तरांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घटनचे पडसाड राज्यात उमटले. मंगळवारी २८ जुलै रोजी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबाच्या बाजूने न्याय मिळावा, यासाठी खटला चालवताना नामांकित वकील दिला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
पीडित मृत पावलेली मुलगीही कबड्डी आणि कराटे खेळ खेळायची. त्यामुळे तिच्याबाबतीत घडलेल्या घटनेमध्ये एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. याप्रसंगी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थ संतप्त
मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय असल्याने, इतर आरोपींचाही शोध घेऊन पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत मुलीचे नातेवाईक, तांबडी ग्रामस्थांनी सोमवारी रोहा पोलीस स्टेशसमोर गर्दी केली. त्याशिवाय पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे यांनी रात्री रोहा तहसीलदार कार्यालयात येऊन समजूत घातली.