राज्यमार्गाच्या कामाला गती; कशेळे-नेरळ मार्गावर डांबरीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:51 PM2019-03-13T22:51:55+5:302019-03-13T22:52:00+5:30
जलद गतीने काम सुरू असल्याने हे काम लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे कमी करण्यात येत असून त्यावर डांबरीकरण केले जात आहे. जलद गतीने काम सुरू असल्याने हे काम लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षांत खराब झाली होती. १२ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहेत. तब्बल ३ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. स्थानिक रस्त्यांची कामे ही स्थानिक ठेकेदारांकडून केल्याने लवकर खराब होतात अशी ओरड गेली अनेक वर्षे केली जात आहेत. त्यामुळे बाहेरील ठेकेदारांना कामे द्यावीत, अशी मागणी मागील दोन वर्षे मान्य झाल्याचे दिसून येत आहे. कशेळे-नेरळ मार्गावरील रस्त्याचे काम ठाणे येथील ठेकेदार कंपनी करीत आहे. त्याचा प्रत्यय कशेळे-नेरळ रस्त्याचे सुरू असलेले काम यावर स्पष्ट होत आहे. या रस्त्यावरील चार ठिकाणी असलेले मोठे उतार हे कमी करण्यात येत आहेत. त्याचवेळी काही ठिकाणी असलेली वळणे यांची तीव्रता देखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रस्त्याचे काम करताना ठेवण्यात आलेला दर्जा लक्षात घेता आणि कामे ही निविदेप्रमाणे व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांचे अभियंते हे रस्त्यावर बसून काम पाहत आहेत. त्यामुळे मे महिन्यापूर्वी किमान कशेळे-नेरळ रस्त्यावरील ७ किलोमीटरचा भाग चांगला होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. याच रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी काही भागात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्या भागात लगेच े खड्डे पडले होते त्यामुळे नव्याने करण्यात येत असलेल्या रस्त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.