एनडीआरएफ बेसकॅम्पच्या हालचालींना वेग; नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:51 AM2023-08-07T07:51:52+5:302023-08-07T07:52:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क महाड : दरवर्षी होणाऱ्या दरड दुर्घटना, भूस्खलन, महापूर, इमारत दुर्घटना पाहता महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प ...

speed up NDRF basecamp movements; It is possible to face natural calamities | एनडीआरएफ बेसकॅम्पच्या हालचालींना वेग; नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं शक्य 

एनडीआरएफ बेसकॅम्पच्या हालचालींना वेग; नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं शक्य 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : दरवर्षी होणाऱ्या दरड दुर्घटना, भूस्खलन, महापूर, इमारत दुर्घटना पाहता महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प करण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी पाच एकर जागाही हस्तांतरीत करण्यात आली आहे. नुकतीच एनडीआरएफ पुणे विभागाकडून एक पथक पाठवून या नियोजित जागेची पाहणी करण्यात आली आहे. 

महाड शहरातील शासकीय दूध डेअरी ही अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या अवस्थेत होती. ही दूध डेअरीची पाच एकरच्या आसपास जागा   शासनाने एनडीआरएफला कायदेशीररीत्या हस्तांतरितही केली. परंतु, यानंतर दोन वर्षांत याविषयी म्हणावी तशी गतिशील हालचाल दिसून येत नव्हती. हा बेसकॅम्प कधी होणार, कधी या कामाला गती मिळणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली असताना गुरुवारी एनडीआरएफ पुणे विभागाकडून एक पथक पाठवून या नियोजित जागेची रीतसर पाहणी केली.

एनडीआरएफ पुणे येथील असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालय महाड यांच्या सहकार्याने या संपूर्ण जागेची नियम, निकषानुसार पाहणी केली. शासनातर्फे आपण नियमानुसार आवश्यक जागा एनडीआरएफ संस्थेला बेसकॅम्पसाठी कायदेशीररीत्या हस्तांतरित केली. त्यांच्या नियम, अटी आणि निकषाप्रमाणे  पाहणी होणे आवश्यक होते आणि त्या उद्देशानेच ही जागेची पाहणी करण्यात आली, अशी 
माहिती निखिल मुधोळकर यांनी दिली.

रायगड, रत्नागिरीसाठी हा कॅम्प महत्त्वाचा 
महाडमध्ये होणाऱ्या बेसकॅम्पचा उपयोग केवळ महाड तालुक्यासह संपूर्ण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आपत्ती काळात तत्परतेने बचाव पथक आणि मदतकार्य पोहोचवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे जलदगतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.

पाहणी अहवाल आल्यानंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार इमारतीचा आराखडा आणि बांधकाम याविषयीचे धोरण अवलंबले जाईल. आवश्यक असणाऱ्या हेलिपॅडसाठी याआधीच जागा सुनिश्चित केली. ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.    - ज्ञानोबा बाणापुरे, 
प्रांताधिकारी, महाड

Web Title: speed up NDRF basecamp movements; It is possible to face natural calamities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.