भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:10 AM2018-08-18T03:10:48+5:302018-08-18T03:11:02+5:30
मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही.
उरण - मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही. आर. एन. शिपिंग कंपनीने १५ आॅगस्टपासून स्पीडबोट सेवा सुरू करण्याच्या लेखी आश्वासनानंतरही सेवा सुरू झाली नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटी वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे स्पीड बोटीच्या इंजिन आणि बोटींच्या इतर कामांची डागडुजी करणे, सुरू झालेला पावसाळी हंगाम, मोरा बंदरात साचत असलेला गाळ आणि इतर तकलादू कारणे पुढे करत प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १६ जूनपासून १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली आहे.
भाऊचा धक्का - मोरा या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात. सागरी मार्गावरील ५० वर्षांपासून चालत असलेल्या जुनाट प्रवासी बोटी मोरा हे ९ किमी सागरी अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी घेतात. या सागरी प्रवासादरम्यान प्रवाशांना अनियमित सेवेचा सामना करावा लागतोच. त्याशिवाय कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मोरा सागरी मार्गावरून पावसाळी हंगामात हवामानाच्या आणि मालक, कर्मचाऱ्यांच्या लहरीवरच प्रवासी बोटी सोडल्या जातात. या सागरी मार्गावर मागील ५० वर्षांपासून खासगी लाँच मालकांचीच मक्तेदारी आहे. लाँचमालकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करण्यासाठी आर. एन. शिपिंग कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षापूर्वी भाऊचा धक्का येथे या स्पीड बोट सेवेचा तीन वर्षापूर्वी शुभारंभही करण्यात आला होता. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटींमुळे ४० मिनिटात मुंबई गाठणे शक्य झाले आहे. मात्र विविध कारणांमुळे प्रवासी वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडू लागले होते.
स्पीड बोट सेवा सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवºयात सापडलेली आहे. कधी इंजिनमध्ये बिघाड तर कधी दुरुस्तीसाठी होणारा विलंब, कधी खराब हवामान तर कधी समुद्राच्या ओहोटीमुळे जेट्टीला बोटी लागणे अशक्य होत असल्याने स्पीड बोटी प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येत होत्या. आता तर पावसाळी हंगाम सुरू होताच स्पीड बोटीची डागडुजी, समुद्राच्या ओहोटीमुळे उद्भवणारी चढउताराची आणि गाळाची समस्या आदि कारणे देत आर. एन. शिपिंग कंपनीने मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सागरी प्रवासी वाहतूक १६ जूनपासून बंद ठेवण्यात येत असल्याचे लेखी पत्रच बंदर विभागाकडे दिले होते.
आर. एन. शिपिंग कंपनीने १५ आॅगस्टपासून स्पीड बोट सेवा सुरू केलेली नाही. किंबहुना स्पीड बोट सेवा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारे कंपनी कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे स्पीडबोट सेवा कधी सुरू होईल, याबाबत काही एक सांगणे कठीण झाले असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.
मात्र दोन महिने बंद ठेवल्यानंतरही स्पीड बोटीची दुरुस्ती अथवा इंजिनची कामे करण्यात मालकांकडूनच दिरंगाई केली जात आहे. स्पीडबोटींचे दुरुस्तीची कामेच झाली नसल्याचे स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत आर. एन. शिपिंग कंपनीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.