गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:10 AM2019-11-07T01:10:15+5:302019-11-07T01:10:50+5:30
टपऱ्या हटवल्या : पोलादपूर बस स्थानक परिसर, महामार्गावर वृक्षतोड
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला दिवाळी संपताच गती आली आहे. पोलादपूर शहरातील कामाला सुरुवात करण्यात आली असून यामध्ये येणाºया टपऱ्यांसह झाडाची तोड सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कामे करताना तसेच मोठी झाडे तोडताना मुख्य मार्गावरील वाहतुकीला अटकाव होत असल्याने ऐन हंगामात प्रवाशांसह पर्यटकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात या मार्गावर प्रवास सुखाचा होणार असल्याने प्रवासी-वाहनचालक सहकार्य करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाच वर्षांपासून सुरू करण्यात आले. मात्र, पोलादपूर शहरातील काम विविध कारणांनी ठप्प होते. मात्र, दिवाळी संपताच कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये संपादित जागेवरील झाडे, टपरीसह अनेक व्यावसायिकांचे गाळे, घरांच्या पुढचा भाग बाधित होत आहे. तालुक्यातील पार्ले ते कातली बंगला या १९ कि.मी.च्या मार्गावरील कामाने वेग घेतला आहे. या ठिकाणी बॉक्सकटिंग करण्यात येणार आहे तर महाबळेश्वरला जाणाºया वाहनांसाठी ओव्हरब्रिज टाकण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी असणाºया टपरीचालक मालकांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे.
पावसाळ्यापूर्वी मातीचे भरावाचे काम करण्यात आले होते, तसेच झाडे हटविण्याचे काम करण्यात येत होते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात व्यावसायिकांसह हॉटेलधारकांच्या व्यवसायावर परिणाम होणार होता, त्याचप्रमाणे या ठिकाणी करण्यात येणाºया कामाबाबत व्यावसायिकांनी घेतलेल्या हरकतींमुळे हे काम लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बॉक्स कटिंगमुळे मुंबईकडून तळकोकणात जाणारी वाहने थेट जाणार असल्याने पोलादपूरमधील टपरी व्यावसायिकांना याचा फटका बसणार असून त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे.