क्रीडा संकुल सात वर्षांपासून अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:47 AM2019-12-25T01:47:44+5:302019-12-25T01:47:57+5:30
श्रीवर्धनमध्ये लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : पूर्णत्वाआधीच तोडफोड झाल्याने क्रीडाप्रेमी नाराज
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन ताुलक्यातील बोर्ली पंचतन येथे सात वर्षांपूर्वी क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र अद्याप संकुल कार्यान्वित न झाल्यान क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून संकुलाचे काम बंद आहे. वापराविना येथील खिडक्यांच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचा १ कोटीचा निधी वाया गेल्याचा सूर क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
श्रीवर्धन तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने शासनाकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर ३ मे २०१३ रोजी संकुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या कामाचा ठेका स्थानिक ठेकेदारास देण्यात आला आहे. क्रीडा खात्यामार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे टप्प्याटप्प्याने १ कोटी रुपये वर्ग झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून क्रीडा संकुलाचे काम बंद आहे.
शासनाचा एक कोटीचा निधी वाया!
च्क्रीडा संकुलाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आतील काही कामे बाकी आहेत. तब्बल सात वर्षे उलटूनही संकुल कार्यान्वित न झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बोर्ली पंचतन येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू झाल्यापासूनच अनेक अडचणी येत आहेत.
च्पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयामार्फत १ कोटींचा निधी बोर्लीपंचतन येथे संकुल उभारण्यासाठी दिला असला तरी प्रथम जागेची अडचण होती. येथील दानशूर रवींद्र नारायण कुळकर्णी यांनी क्रीडा संकुलासाठी १०० गुंठे जागा शासनास विनामोबदला बक्षीस पत्र केली. त्यामुळे संकुलाच्या जागेचा प्रश्न निकाली लागला.
च्संकुलाच्या इमारतीचे बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप ती कार्यान्वित न झाल्याने या ठिकाणी तळीरामांचे अड्डे तयार होत आहेत. त्यामुळे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व आदिती तटकरे यांनी क्रीडा संकुल लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.