नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:38 AM2021-04-02T02:38:35+5:302021-04-02T02:39:15+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
रायगड : जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे
८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये क्रीडा संकुलासाठी आवश्यक असणारी सरकारी जमीन उपलब्ध न झाल्याने विभागीय क्रीडा संकुल रायगड जिल्ह्याच्या पदरात पडले आहे.
माणगाव-नाणोरे येथे उभारण्यात येणारे विभागीय क्रीडा संकुल काेकणातील खेळाडूंसाठी माइल स्टाेन ठरणार असल्याचा विश्वास रायगडच्या पालकमंत्री तथा क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्यात येणार हाेते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक सरकारी जमीन उपलब्ध झाली नाही. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल हे काेकणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे असल्याचे मत तटकरे यांनी मांडले हाेते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नाणाेरे येथील स.नं.१३०/० मधील १०.०० हेक्टर (२४ एकर) सरकारी जमीन विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी त्र्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख सोळा हजार रुपयांच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यास सरकारने मान्यता दिली आहे.
विभागीय क्रीडा संकुलात काय?
या क्रीडा संकुलामध्ये ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ, फुटबॉल मैदान, ॲथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रूम, आऊटडोअर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेनवॉटर हार्वेस्टिंग त्याचप्रमाणे बोअरवेल, फिल्टरेशन प्लँट, जलतरण व डायव्हिंग तलाव सुविधांचा समावेश आहे.