रस्त्यामुळे अधिकाºयांना घेतले फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:01 AM2017-08-03T02:01:44+5:302017-08-03T02:01:44+5:30
रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी
अलिबाग : रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी अलिबाग तालुका भाजपाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विलास पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. भाजपा पदाधिकारी आक्रमक झाल्याने विलास पाटील यांची भंबेरी उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सुरु वात होईल, त्यामुळे ३० जुलै रोजी रेवदंडा पारनाका येथे करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करावे, असे लेखी पत्र विलास पाटील यांनी गेल्या महिन्यात आंदोलकांना दिले होते.
सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्यापही कामाला सुरु वात न केल्याने अलिबाग भाजपाचे पंचायत समिती सदस्य उदय काठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पाटील यांची भेट घेतली. रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सस्ते यांनी ही बैठक घडवून आणली होती. अलिबाग-रेवदंडा मार्गाची झालेल्या दुरवस्थेची तातडीने पाहणी करा, रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी उदय काठे यांनी लावून धरली. त्यावेळी विलास पाटील यांची खुर्ची काढून घेण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तो हाणून
पाडला.
आंदोलकांच्या मागणीकडे पाटील यांनी दुर्लक्ष केल्याने आंदोलक कमालीचे संतापले. त्यांनी पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. खुर्चीत बसून जनतेची कामे करता येत नसतील तर खुर्च्या खाली करा, अशी मागणी भाजपाचे सतीश लेले यांनी केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरा आंदोलकांच्या संयमाचा बांध तुटला तर तुम्हाला कठीण जाईल. यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी, चालेल, असेही लेले यांनी स्पष्ट
केले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे अॅड.महेश मोहिते, दर्शन प्रभू, नीलेश महाडिक, अॅड. अंकित बंगेरा, राजेश पाटील, मनोज जैन, पुनीत शेठ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.