नेरळ : नेरळ परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात जिल्हा परिषदेने आता कारवाईचे हत्यार उपसले असून, यामुळे बिल्डर लॉबीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. बुधवार २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेकडून पथक नेरळमध्ये दाखल होऊन या पथकाने धामोते, बोपेले परिसरात रस्त्यावर आलेल्या बांधकामांची मोजमापे घेतली तसेच अनधिकृत कामांची यादीही बनवली आहे. या कारवाईच्या भीतीचा धसका घेतलेल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात एकच गर्दी केली होती.नेरळ विकास प्राधिकरण हद्दीतील बांधकाम व्यावसायिक हे अनधिकृत कामे करीत असून त्यामुळे सदनिकाधारकांची फसवणूक होणार आहे. या मुद्यावरून कोल्हारे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष विजय हजारे यांनी चौकशीची मागणी जिल्हा परिषदेकडे करून आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता. यामुळे जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे पथक २१ फे ब्रुवारीलानेरळमध्ये दाखल झाले. या पथकाचे तीन भाग करून एक पथक नेरळ-कळंब राज्य मार्ग १०९ वरची रस्त्यालगतची बांधकामे, नेरळ-बोपेले इतर जिल्हा मार्ग २७ वरची रस्त्यालगतची बांधकामे व नेरळ-पेशवाई रस्त्यालगतची बांधकामे अशा तिन्ही रस्त्यालगतच्या बांधकामांची मोजमापे घेऊन चौकशी व पडताळणी करण्यात आली. यामध्ये नेरळ-बोपेले इतर जिल्हा मार्ग २७ मधील रस्त्यालगत असलेल्या ३४ इमारती व दुकानांची नावे जाहीर केली आहे. त्याचबरोबर अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये धाव घेतली. अनेकांनी आपली कागदपत्रे व परवानग्याही सदर केल्या, मात्र त्यात अनेक दोष आढळून आले. लवकरच या अनधिकृत कामांवर कारवाईचा आसूड जिल्हा परिषदेकडून ओढला जाणार असल्याचे समजते. त्याकरिता महसूल विभागाने दुय्यम निबंधक यांना अनधिकृत कामांची थेट यादीच पाठवून त्याची खरेदी-विक्र ी थांबवली आहे. तसेच विधानसभा सदस्य मनोहर भोईर हे विधानसभेत या अनधिकृत कामांचा तारांकित प्रश्न मांडणार असल्याने या प्रकरणाला आता थेट वरूनच दबाव येणार आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.जिल्हा परिषदेच्या या पथकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग उप अभियंता ए.ए. केदार, लघु पाटबंधारे उप अभियंता ए.आर. कांबळे, पंचायत समिती कर्जतच्या अभियंता मनीषा शीद, जी. आर. देशमुख, पी. एस. गोपने आदींसह कर्मचारी उपस्थित होते.तंटामुक्ती अध्यक्ष विजय हजारे यांनी कोल्हारे हद्दीतील अनधिकृत बांधकामाच्या केलेल्या तक्र ारीवरून आता जिल्हा परिषद विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यामुळे आता हा विभाग नेरळ व ममदापूरमधील अनधिकृत बांधकामाकडेही आपला मोर्चा वळवणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजले आहे.
अनधिकृत बांधकामांविरोधात पथक कोल्हारे गावात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:51 AM