म्हसळा : गेल्या ३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरेश्वर या ठिकाणचे नैसर्गिक, खाजगी मालमत्ता त्याचप्रमाणे झाडे, घरे यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच आजपर्यंत अनेक गावे अंधारात आहेत. विजेचे अनेक खांब पडले असून ते उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामास विलंब होऊ नये म्हणून मानवता हाच धर्म आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो श्रीसदस्य या आपत्तीत पुढे सरसावत डोंगरदरीतून विद्युत खांब उभे करीत आहेत.श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यांत निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले तर अनेक विद्युत खांब जमीनदोस्त केले. ३ जूनपासून आजपर्यंत प्रशासन नियोजन करीत आहे. व्यापकता मोठी असल्याने त्या ठिकाणी प्रशासनदेखील हतबल होत आहे. त्या ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र येऊन गेल्या आठ दिवसांपासून प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, दिघी, गाळसुरे, साखरी, निगडी, सायगाव, मारळ, कुरवडे, मारळ बौद्धवाडी, कुरवडे बौद्धवाडी, काळीजे या ठिकाणी वीज खांब उभे करण्यास २०० हून अधिक सदस्य काम करीत आहेत. या वेळी एसटी विद्युत वाहिनीचे आतापर्यंत ४४ खांब, एलटी विद्युत वाहिनीचे ७४ खांब बसवून त्यांची विद्युत वायर जोडणीदेखील केली आहे. हे काम करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाच्या सरींत काम करीत आहेत.ग्रामस्थांनी मानले आभारआजवर प्रतिष्ठानने वेळावेळी प्रशासनास मदत केली आहे. विविध उपक्रम राबवत शासनाचे काम हलके केले आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून सर्वच ग्रामस्थांनी हातभार लावत प्रतिष्ठानचे हात जोडून आभार मानले आहेत. हे काम सुरू होताच त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांनी भेट घेत प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी झाले.
प्रकाशासाठी डोंगरदऱ्यांत राबताहेत श्रीसदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्युत खांब उभे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:42 AM