श्रीसदस्यांनी केली साफसफाई
By admin | Published: December 14, 2015 01:32 AM2015-12-14T01:32:36+5:302015-12-14T01:32:36+5:30
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सबंध महाराष्ट्रासह देशाच्या निवडक महानगरात स्वच्छता अभियान राबविले.
पेण : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सबंध महाराष्ट्रासह देशाच्या निवडक महानगरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी ३००० श्री सदस्यांनी पेणमध्ये स्वच्छता अभियान राबविले.
शिस्तीमुळे राष्ट्र मोठे बनते, सहिष्णुता व परस्पर सहकार्यातून राष्ट्रहिताची विधायक कार्ये चुटकीसारखी मार्गी लागतात. राष्ट्राच्या विधायक कार्यात राष्ट्राभिमानी नागरिकांचा सहभाग कसा असावा व त्यांचे मूल्य किती महत्वाचे असते याची खरीखुरी शिकवण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्यातूनच मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छतादूत म्हणून त्यांची निवड केली त्या निवडीतून स्वच्छ महाराष्ट्राचा नवा अध्याय घडला, असे प्रतिपादन पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले.
पेण शहराच्या चार दिशाच्या परिसरातील १४ किमी परिसरातील रामवाडी बसस्थानक ते पेण खोपोली रोडस्थित विश्वेश्वर स्मशानभूमी, जुना पेट्रोल पंप ते प्रांत कार्यालय, अंतोरा फाटा ते नगर परिषद इमारत, चावडीनाका ते पोलीस ठाणे, हुडको मैदान - कुंभार आळी, गांधी मंदिर ते प्रायव्हेट हायस्कूल पेण बस आगार आदी ठिकाणी १३ बैठकीच्या श्री सदस्यांनी स्वच्छता केली. पेण शहरात सकाळी ७ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साफसफाई करण्यात आली. तब्बल २५ टन ओला व ५५ टन सुका कचरा गोळा केला. यासाठी २२ वाहनांची व्यवस्था केली होती व गोळा झालेला सर्व कचरा आंबेघर - धामणी येथील डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात आला.
कर्जत शहर चकाचक
कर्जत : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत नगरपरिषदेच्या सहकार्याने कर्जत शहरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सुमारे तीन हजार श्रीसदस्यांनी ३२ वाहनांच्या सहाय्याने शहराची स्वच्छता केली. स्वच्छता अभियानाचे उद्घाटन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नितीन सावंत, मुख्याधिकारी दादाराव आटकोरे आदी उपस्थित होते. तालुक्यातील २२ बैठकीचे श्रीसदस्य सहभागी झाले होते.
उरणमध्ये स्वच्छता संदेश अभियान
चिरनेर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात मोठे स्वच्छता संदेश अभियान राबविण्यात आले. देशातील ८५ पेक्षा जास्त शहरांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त दासभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला. उरणमध्ये या अभियानाची सुरूवात आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आली. या स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष गणेश शिंदे, तहसीलदार नितीन चव्हाण, निवासी नायब तहसीलदार रवींद्र पाटील आदी सहभागी झाले होते.
महाडकरांनी केले मोहिमेचे स्वागत
महाड : शहरातील शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी मार्ग, भाजी मार्केट, चवदार तळे आदी सार्वजनिक ठिकाणी श्रीसदस्यांनी साफसफाई केली. रविवारी सकाळी ७ वा. सुरुवात झालेल्या या स्वच्छता अभियानामध्ये हजारो श्रीसदस्यांसह, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विद्यार्थीही सहभागी झाले होते. श्रीसदस्यांच्या स्वच्छता अभियानाचे महाडकरांनी स्वागत केले.
माथेरान : माथेरानमध्ये तालुक्यातील असंख्य श्रीसदस्यांनी मिळून संपूर्ण ५२ किलोमीटर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सकाळी ७ वाजता या मोहिमेची सुरु वात करण्यात आली. माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या अधिक असल्याने येथील विविध भागात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, गुटखा पाकीट असा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला.