चालकाच्या सतर्कतेने टळला एसटी अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:34 AM2018-08-03T03:34:17+5:302018-08-03T03:34:25+5:30
कळंब-नेरळ मार्गावरील संभाव्य अपघात एसटीचालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला. कर्जत एसटी आगाराच्या ओलमन-नेरळ बसच्या मागील चाकाचे नट्स निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला.
- कांता हाबळे
नेरळ : कळंब-नेरळ मार्गावरील संभाव्य अपघात एसटीचालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला. कर्जत एसटी आगाराच्या ओलमन-नेरळ बसच्या मागील चाकाचे नट्स निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला. चालकाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने बिरदोले नजीक गाडी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.
कर्जत आगाराची बस बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ओलमनहून नेरळकडे येत असताना, वाहनचालक चव्हाण यांना गाडीच्या चाकांमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला व त्यांनी बस थांबवून चाकांचे निरीक्षण केले. या वेळी मागील चाकाचे दोन नट ढिले होऊन निखळण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खरे तर बसच्या चाकाला आठ नट बसवलेले असतात; पण या बसच्या चाकास बसवलेल्या आठ नट्सपैकी पाच नट्स आधीच निघालेले होते तर उरलेल्या तीन नट्स पैकी दोन सैल होऊन निघाले होते, त्यामुळे ते चाक बसपासून निखळून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती. चालक चव्हाण यांनी स्वत:च ते नट बसवून गाडी नेरळपर्यंत नेली. बसचा चालक चव्हाण व वाहक आगीवले यांनी दाखवलेल्या सावधगिरीमुळे ओलमन बसमधील २५ प्रवाशांचा जीव वाचला. या संदर्भात कर्जत आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.