सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्क दासगाव : देशभरात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालल्याने गेले अनेक दिवस नागरिकांना निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याने महाड आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने गाव तिथे धाव घेणाऱ्या एसटीने महाड आगारात विश्रांती घेतली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. याचे लोण आता ग्रामीण भागातदेखील पोहोचले गेले. यामुळे शासनाने सुरुवातीला मिनी लॉकडाऊन करत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली. मात्र, खासगी प्रवासी वाहने सुरूच असल्याने शहरातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने यावर मार्ग काढण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले. पुन्हा नवी नियमावली जाहीर केली आहे.
या नवीन नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येण्यास तयार नाहीत. शिवाय, शहरातील नागरिकांनीदेखील मोठ्या शहरात आणि इतर ठिकाणी जाण्याकडे पाठ फिरवल्याने एसटी प्रवासीसंख्या घटू लागली आहे. लांब पल्ल्यांच्या, ग्रामीण फेऱ्यांना ही घटलेली प्रवासीसंख्या परवडणारी नसल्याने महाड आगाराने अनेक फेऱ्या रद्द केल्या.
दिवसाला ५०० ते ६०० किमीचाच प्रवास एसटीचा दिवसाला किमान ५०० ते ६०० किमीचाच प्रवास होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिकांसाठी एसटी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. घटलेल्या प्रवासीसंख्येमुळे गतवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील अनेक बसेस महाड आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. दिवसभर घरघर करत फिरणाऱ्या एसटीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विश्रांती घेतली आहे.
रद्द केलेल्या फेऱ्यामहाड एसटी आगाराने महाडमधून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी महाड-बोरिवली, महाड-पनवेल, महाड-ठाणे, तर ग्रामीण भागातील महाड-पोलादपूर, महाड-सापे, महाड-बागलवाडी, महाड-छ. निजामपूर, पोलादपूर-तुटवली या बसेसच्या एकूण ६२ फेऱ्या यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या ७ ते १८ एप्रिलपर्यंत रद्द केल्या होत्या. सध्या महाड-पनवेल, महाड-पुणे आणि मोजक्याच ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत.
मोजक्याच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एखाद्या फेरीकरिता लागणारे प्रवासी उपलब्ध असल्यास बस सोडण्यात येत आहे.– शिवाजी जाधव, प्रभारी आगारप्रमुख