Mumbai Goa Accident ( Marathi News ) : मुंबई-गोवा हायवेवर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून राजापूरला जाणाऱ्या बसला मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे इथं हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून राजापूरला जाणारी बस रात्री १२ वाजताच्या सुमारास नागोठणे इथं पोहोचली होती. यावेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला ही बस धडकून अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले असून यातील गंभीर जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जात आहेत. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी दिवसभर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शुक्रवार सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या.