महाड (रायगड) - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये 60 प्रवासी असून ते थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भीषण आगीत एसटी जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे गणेशोत्सवासाठी जादा एसटी सोडण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ वडपाले येथे रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटीला भीषण आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. त्यामुळे एसटीतील 60 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या एसटीमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून गेले आहे. महाडजवळील वडपाले गावाजवळ कोकणात जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ही काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर 2 ते 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता खालील मार्गानी प्रवास करावा.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एन.एच.48) येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली-वाकण (67.5 कि.मी.) मार्गावरून जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस, वाहने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळून मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच-4) सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा. कळंबोली-हातखंबा मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच 4), सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-साखरपा-हातखंबा या रस्त्याने जावे. तसेच कळंबोली-राजापूर मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-लांजा-राजापूर या मार्गाने जावे. कळंबोली-कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरुन-कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली या रस्त्याचा वापर करावा. सावंतवाडीला जणाऱ्या वाहनांनी कळंबोली-सावंतवाडी ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट-सावंतवाडी या रस्त्याचा वापर करावा.
महामार्गावर येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाईट www.highwaypolice.maharashtra.gov.in तसेच हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 तसेच संक्षिप्त संदेश सेवासाठी (SMS) 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.