निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये मोफत वायफाय सेवा सुरु केली होती. मात्र वर्षभरातच ही सेवा बारगळी. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणेही कारभार चालल्याचे समोर आले आहे. गावा-वाड्यात राहणार्या प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्यायी मार्ग मिळू लागला. ज्यादा पैसे मोजून निश्चित स्थळी वेळेवर पोहचण्याची संधी मिळू लागली. त्यामुळे अनेक जण एसटी बसमधून दुरावलेले होते. एसटीतील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने 2017 मध्ये बसमध्ये मोफत वायफाय सेवा सुरु केली.
यंत्र मिडीया सोल्युशन या कंपनीमार्फत ही सेवा सुरु करण्यात आली होती. या वायफायमुळे प्रवाशांना सिनेम्यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजानाचे कार्यक्रम एसटी बसमधून पहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे या उपक्रमाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सर्वजण एसटीतून प्रवास करू लागले. मात्र दोन वर्षात ही योजना बारगळी.
कंपनीला ही सेवा देणे न परवडण्यासारखे झाल्याने वायफाय सेवा बंद करण्यात आली. त्याचा परिणाम एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांची निराशा झाली. ही योजना बारगळ्याने नाराजीचे सुर उमटत आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ विविध योजना राबवित आहे. दरवर्षी प्रवासी वाढवा अभियान राबविले जाते. एसटी महामंडळात शिवशाही बस आणून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या बसमध्ये वातानुकूलित यंत्र बिघडलेले. पडदे फाटलेले अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.