अलिबाग : मंगळवारी ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. सोमवारी ६ मे रोजी मतदान केंद्रात मतपेटी पोहचविण्याची प्रक्रिया निवडणूक विभागातर्फे सुरू झाली आहे. कर्मचारी आणि मतपेटी मतदान केंद्रावर नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेस निवडणूक कामासाठी कार्यरत आहेत. मात्र बसेस निवडणूक कामासाठी लागल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता.
अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतपेटी बसने मतदान केंद्रात नेण्यासाठी एस टी बसेस लावण्यात आल्या आहेत. अलिबाग आगारातील ७ बसेस कर्मचारी तर ५२ बसेस मतपेटी मतदार केंद्रात नेण्यासाठी सेवेत दाखल आहेत. मात्र यामुळे प्रवाशाचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बसेस ह्या निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने अलिबाग एस टी आगारातील बसेस संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रोज वेळेत सुटणाऱ्या अनेक बसेस ह्या रद्द करण्यात आल्या होत्या.
अलिबाग मधून शासकीय, खाजगी तसेच प्रवासी हे रोज पेण, खोपोली, रोहा तसेच इतर ठिकाणी कामासाठी येजा करीत असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी अलिबाग आगरसह तालुक्यातील थांब्यावर प्रवासी बस ची वाट पाहत असतात. मात्र सोमवारी अनेक बसेस ह्या निवडणूक कामासाठी गेल्याने रोजच्या वेळेत सुटणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. अलिबाग आगर व्यवस्थापन यांनी प्रवाशाच्या रोजच्या बसेसचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना आगारात, थांब्यावर बसची वाट पाहत नाहक ताटकळत बसावे लागले होते. तर आगर व्यवस्थापन याना विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडवा उडविची उत्तरे प्रवाशांना मिळत होती.