वडखळ : वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य जरी प्रचलित असले तरी हे ब्रीदवाक्य प्रवास करताना पाळले जाते; मात्र प्रवास करताना तिकीट न काढणारे प्रवासी देखील काही कमी नाहीत. या वर्षभरात रायगडएसटी महामंडळाने जवळपास २६ हजार ८४० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यात १२ टीसींची नेमणूक केली आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी दिलेल्या विविध प्रकारच्या सुविधा आणि योजनांच्या लाभामुळे राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा एसटी फुल्ल होऊन अनेक प्रवासी बसमध्ये उभे राहून देखील प्रवास करताना दिसत आहेत. अनेक प्रवासी विनातिकीट म्हणजेच फुकटचा प्रवास करतात.
फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी रायगड एसटी मंडळाने १२ टीसींची नेमणूक केली असून त्यांनी वर्षभरात कारवाई केली आहे. १४७ फुकटचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणी मार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७,७६० तिकिटाची रक्कम तर १९,०८० ही तिकिटावरील दंडात्मक अशी एकूण २६, ८४० रुपयांची वसुली केली आहे.
एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षित आणि कमी किमतीत प्रवास सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे, तरी देखील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत की खेदजनक बाब आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता कमी झाली असली तरी हा प्रकार पूर्णपणे बंद करून प्रवाशांनी तिकीट काढूनच एसटीने प्रवास करावा आणि एसटी महामंडळाला सहकार्य करावे.-दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड