एसटी आगार नव्हे समस्यांचे भांडार, अलिबागमध्ये प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:59 AM2018-04-02T06:59:13+5:302018-04-02T06:59:13+5:30
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते.
- आविष्कार देसाई
अलिबाग जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते. प्लॅटफार्म तुटलेले आहेत, तर आगाराच्या इमारतीची एवढी दुरवस्था झाली आहे की, ते कधी कोसळेल याचा नेम नाही. वीकेंडला येथे प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालाय, जिल्हा पोलीस मुख्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद अशी महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुकास्तरावरील विविध सरकारी आणि निमसरकारी आस्थापना आहेत. विविध माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, शाळा आहेत. कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येथे मोठ्या संख्येने लोक येत असतात. ग्रामीण भागातून तसेच तालुका ठिकाणाहून येणाºयांसाठी एसटी हे प्रवासाचे महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित साधन आहे. मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करणाºयांची संख्या आजही कायम असल्याचे आपल्याला दिसून येते. रायगड जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, बौद्धकालीन लेण्या त्याचप्रमाणे सुंदर आणि विस्तृत समुद्रकिनारे आहेत. येथील पर्यटन स्थळांचे आकर्षण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीकेंडला सुुमारे पाच हजार पर्यटक येथे येत असतात. यातील सर्वच पर्यटक एसटीने प्रवास करणारे नसले तरी, त्यातील ५० टक्के हे एसटीने प्रवास करणारेच असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध सवलतीच्या प्रवासाचे प्लॅन सुरू केले आहेत. त्यावरून येथे असणारी गर्दी स्पष्ट होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी हे येथून ये-जा करीत असतात. त्यांच्यामार्फत एसटी महामंडळाच्या तिजोरीत लाखो रुपये जातात; परंतु अलिबागच्या एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
१अलिबाग येथील एसटी आगाराची इमारत जीर्ण झाल्यामुळे तेथील छपराला तडे गेले आहेत. त्यामुळे छप्पर कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळच्या वेळी इमारतीची डागडुजी होत नसल्यामुळे इमारतीची अशी अवस्था झाली आहे, असा आरोप प्रवासी संघटनेने वेळोवेळी केला आहे. इमारतीला रंग दिलेला नसल्याने तिला बकाल स्वरूप आले आहे.
२आगाराच्या परिसरामध्ये निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट रोजच्या रोज लावली जात नसल्याने तेथे कचºयाचे ढीग जमा होतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. आगारामध्ये उनाड गुरे-ढोरे, बकºया, भटकी कुत्री यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी केलेल्या घाणीचाही त्रास होतो. त्याचप्रमाणे हे जागोजागी बसलेले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
मनोरुग्ण, भिकाºयांमुळे प्रवासी हैराण
आगारामध्ये मोठ्या प्रमाणात भिकारी, मनोरुग्ण सातत्याने दिसून येतात. त्यामुळेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. भिकारी थेट महिलांच्या पर्सला हात लावून भीक मागतात. याच आगारामध्ये बिनकामाच्या व्यक्ती बसलेल्या दिसून येतात, तर काही प्रवाशांना बसण्याची सोय केलेली आहे, तेथील सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेलेही असतात. त्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पाहताना ताटकळत उभे
राहावे लागते.
आगार परिसरामध्ये खासगी वाहने पार्किंग करता यावीत, यासाठी तेथे पे अॅण्ड पार्क सुविधा सुरू केली आहे. मात्र, बहुतांश खासगी वाहने ही एसटी आगाराच्या मुख्य द्वारापाशीच तळ ठोकून उभी असलेली दिसून येतात. त्याच मुख्यद्वारावर पोलीस चौकी आहे; परंतु या सर्व घटनांकडे तेही गांभीर्याने पाहत नसल्याने तेथे दिवसागणिक खासगी वाहनांची गर्दी वाढली आहे.
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आगारात नसल्याने पाण्यावाचून प्रवाशांचे हाल होतात. पाणी उपलब्ध नसल्याने नाइलाजाने तेथील स्टॉलवरून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. लायन्स क्लबने तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तेथील पाणपोई कायमस्वरूपी बंदच असल्याचे दिसून येते.
एसटी आगार परिसरामध्ये असणारे स्वच्छतागृह हेही सातत्याने अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तेथील दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. स्वच्छतागृहाचीही दैना उडाली असल्याने प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामध्ये विशेष करून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
अलिबाग आगारप्रमुख एस.पी.यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. आगाराच्या दुरवस्थेबाबत रजेवरून आल्यावर बोलू, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.