एसटीचालकाने दिली कारला धडक, मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:44 AM2020-09-01T01:44:00+5:302020-09-01T01:44:20+5:30
एसटीचालक हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, या चालकाकडून या हद्दीत दुसरा अपघात असल्याचे ही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दासगाव : सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर निगडे-दापोली-बोरीवली या एसटीची एक कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात कारचा चुराडा झाला, तर कारचालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, एसटीचालक हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, या चालकाकडून या हद्दीत दुसरा अपघात असल्याचे ही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत निगडे दापोली बोरीवली एसटी बस क्रमांक एमएच २०-बी एल ३६६० ची स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०६ बी यू ८१३६ हिला मागून जोराची धडक बसली. यामुळे कार पुढे असलेल्या दुसऱ्या गाडीवर आदळली. त्यामुळे कारच्या मागच्या आणि पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये कारमधील अख्तर जमाल आणि युसूफ चौधरी दोघे (राहणार गोरेगाव, तालुका माणगाव) किरकोळ जखमी झाले.
ही एसटी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निगडे तालुका दापोली येथून सुटली होती, तर यामध्ये २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर एसटीचालक अप्पासाहेब गरजे (राहणार नगर जामखेड) यांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्ग वाहतूक पोलिसांनी महाड हद्दीत याला ताब्यात घेतले.
वाहतुकीचा खोळंबा
अपघातानंतर जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघात ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे जी.ए. भिल्लारे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे नितेश कोंडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत, काही वेळेतच वाहतूक सुरळीत केली.