अलिबाग : एसटी बसचालक यांच्या हातात बसमधील पन्नासहून अधिक प्रवाशांच्या जीवाचे भवितव्य असते. असे असतानाही श्रीवर्धन आगारातून श्रीवर्धन ते मुंबई ही बस घेऊन जाणाऱ्या आबाजी धडस या चालकाने कर्तव्यावर असतानाही प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता मद्यपान केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वाहक अभय कासार याने प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप रामवाडीपर्यंत आणले. ही घटना शुक्रवारी घडली.
गणेशोत्सव सणाला आलेले चाकरमानी हे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी श्रीवर्धन आगारातून साडेचार वाजता बस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे निघाली. श्रीवर्धन-मुंबई बसवर आबाजी धडस हे चालक तर अभय कासार हे वाहक होते. चालक धडस हे श्रीवर्धन आगारातून बस घेऊन निघाले. सहा-साडेसहापर्यंत बस माणगाव आगारात पोहोचली. त्यानंतर चालक धडस याची प्रवाशांची इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी असताना ती टाळून ते मद्य पिण्यास गेले. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
चालक निलंबित वाहक अभय कासार यांना ही माहिती कळताच त्यांनी श्रीवर्धन आगरप्रमुखांशी संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांनी एसटी बसमध्ये असलेला वाहक कम चालक असलेले कासार यांना चालकाला बाजूला करून बस सुखरूप नेण्यास सांगितले. त्यानुसार वाहकांने माणगाव ते रामवाडी असा ६० किमी बस चालवून प्रवाशांना सुखरूप आणले. रामवाडी येथे बस आल्यानंतर मद्यपी चालक आबाजी धडस याच्यावर पेण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित चालकावर तत्काळ सेवेतून कारवाई करत निलंबित केली असल्याची माहिती आगर व्यवस्थापक मणियार यांनी सांगितले.