कर्जत : कर्जत आगारातील चालक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्यापि त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नसल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा भंग केल्याने कर्जत आगार प्रमुखांवर कारवाई व्हावी व आम्हाला त्वरित बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी येथील कर्मचाºयांनी आमरण उपोषणाला बुधवारी कामगार दिनाच्या दिवशीच कर्जत एसटी आगाराच्या बाहेर सुरु वात केली आहे.
कर्जत आगारात एकूण १९२ चालक व वाहक असे १४ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. येथील कर्मचारी १५ ते १६ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार अनेक वेळा बदलीची मागणी करूनही वरिष्ठ कार्यालयाने त्यांची मागणी कधीच मान्य केली नाही. नियमानुसार तीन वर्षे एकाच ठिकाणी नोकरीत कर्तव्य बजावल्यावर बदलीची मागणी केल्यास बदली होणे गरजेचे असते. यावेळी मध्यवर्ती कार्यालय मुंबई व विभागीय कार्यालय राज्य परिवहन रायगड विभाग यांनी २८ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. आज चार महिने झाले तरी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याबाबत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना बदली झालेल्या कर्मचाºयांनी विचारले असता होळी झाल्यावर कार्यमुक्त करू, असे तोंडी सांगण्यात आले होते. मात्र, कर्मचाºयांची दिशाभूल करून त्यांच्या मर्जीतील पाच कर्मचाºयांची आर्थिक देवाण-घेवाण करून बदली केल्याचे उपोषणकर्त्या कर्मचाºयांनी आरोप केला आहे. ज्या पाच जणांची बदली केली ती सेवाज्येष्ठता यादी डावलून केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्जत व्यवस्थापकांना सेवाज्येष्ठता यादीनुसार बदली करा, आमच्याही कौटुंबिक अडचणी आहेत असे सांगितले असता चालकांची कमतरता आहे, असे कारण पुढे केले जाते.
कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी चालकांची कमतरता आहे, याबाबतीत वरिष्ठ कार्यालयास अद्यापपर्यंत कधीच पत्रव्यवहार केलेला नाही, तर येथे जादा कर्मचाºयांची गरज नाही, असे वरिष्ठांना सांगितल्याचे उपोषणकर्ते राजेश दौलत अपोतीकर यांनी सांगितले. जून महिन्यात आम्हाला कार्यमुक्त केल्यावर मुलांचे दाखले, कुटुंबाला येथून स्थलांतर करताना अनेक अडचणी येतील म्हणून आताच कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या वेळी राजेश आपोतीकर, हुसेन गेडाम, गणेश चांदेकर, उमेश चांदेकर ,विनोद उइके, विनोद कनाके, विनोद आत्राम, बाजीराव शिंदे आदी कर्मचारी आमरण उपोषणाला बसले. या आंदोलनाला काँग्रेस इंटक संघटनेने पाठिंबा दिल्याचे सचिव एस.एस.हिले यांनी सांगितले.
ज्या पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यात कुठलाही आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार झाला नाही, हा आरोप खोटा आहे. चालकांची कमतरता असल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून १ जूनला सर्वांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले जाईल.- शंकर यादव, आगार व्यवस्थापक, कर्जत