सेंट जोसेफ शाळेतील फीवाढ रद्द
By admin | Published: March 25, 2016 12:37 AM2016-03-25T00:37:50+5:302016-03-25T00:37:50+5:30
नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने केलेली भरमसाट फीवाढ रद्द करण्यासाठी पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते.
पनवेल : नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने केलेली भरमसाट फीवाढ रद्द करण्यासाठी पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते. पालकांनी शाळेच्या गेटच्या बाहेर ठिय्या मांडून फीवाढीचा निषेध केला. पालकांच्या या आंदोलनाला यश आले असून शाळा प्रशासनाने ही फीवाढ रद्द केली.
उपोषणात पालकांनी ११ मागण्यांचा उल्लेख केला होता. सर्व विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाची वागणूक देण्यात यावी, प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांचा हजेरीपट असावा व १ वर्गशिक्षिका कायम स्वरु पात असावी, पी. टी.ए. सभासदांची निवड पारदर्शक असावी, शासन नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जादा फी, अनिवार्य सहलची सक्ती करण्यात येऊ नये, नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण शुल्क समितीची स्थापना करण्यात यावी, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, सिडको आदेशानुसार शाळेचे मैदान सायंकाळनंतर स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, मुले यांना खुले करण्यात यावे, शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या अहवालाची त्वरित पूर्तता करु न शाळेच्या नोटीस बोर्डवर प्रत लावण्यात यावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराबाबत पालक त्रस्त झाले होते. वारंवार निवेदन देऊन देखील शाळा प्रशासन फी वाढ मागे घ्यायला तयार नसल्यामुळे पालकांनी उपोषण करायचे ठरवले. दरम्यान, यासंदर्भात पालकांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन देवूनही वाढ रद्द करण्याची विनंती केली होती. (प्रतिनिधी)
बैठकीत निर्णय
रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बडे, पनवेलचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, सेंट जोसेफ शाळेचे जॉर्ज, तसेच पालक प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शाळा प्रशासनाने फीवाढ मागे घेतली.