गणेशभक्तांच्या एसटीची कंटेनरला धडक, एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:40 AM2023-09-18T06:40:54+5:302023-09-18T06:41:26+5:30
डोंबिवलीहून कोकणात निघालेल्या बसला माणगावजवळ अपघात
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मौजे रेपोली गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एसटीने कंटेनरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात एका गणेशभक्ताचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी व मुलगादेखील गंभीर जखमी झाले आहेत. ही एसटी बस डोंबिवलीहून लांजाकडे जात होती.
बेदरकारपणे कंटेनरचालकाने कंटेनर उजव्या लेनवरून डाव्या बाजूच्या लेनवर घेतल्याने पाठीमागून येणाऱ्या एसटीची ठोकर लागून अपघात घडला. याबाबतची तक्रार चालक युवराज बाबूराव बनसोडे (रा. कानडी, जि. बीड) यांनी दाखल केली आहे. या अपघातात विनोद पांडुरंग तारले (३८, मूळ रा. राजापूर) यांचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी वैष्णवी तारले (३६) व मुलगा अथर्व तारले (१५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना एमजीएम रुग्णालय दाखल केले आहे. या एसटी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी प्रवास करीत होते. यातील एक प्रवासी विनोद तारले यांचा मृत्यू झाला. यातील ३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचार करण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिस स्टेशन गोरेगाव, महामार्ग वाहतूक पोलिस व स्थानिक लोकांनी अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने एक लेन चालू केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून थोड्या वेळातच दोन्ही लेन चालू केल्या.
लांजाला निघाले होते तारले कुटुंब
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवारी डोंबिवलीतून बसेस सोडल्या होत्या. विनोद हे कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगरमधील चाळीत राहत होते. गणपतीसाठी कोकणातील लांजा या त्यांच्या गावी ते कुटुंबासह जात होते. शनिवारी रात्री डोंबिवलीतील रेल्वे ग्राउंड येथून राजापूरकडे सुटलेल्या बसमधून प्रवास करीत असताना माणगावजवळ हा अपघात झाला. बस चालकाच्या बाजूला बसलेले विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, डोंबिवलीहून शिवसेनेचे अनेक पदाधिकारी माणगावला रवाना झाले. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी लांजा या त्यांच्या गावी नेण्यात आला आहे.