रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी एसटीचालक, वाहकांचे ‘हाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:01 AM2020-03-02T00:01:39+5:302020-03-02T00:01:47+5:30
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी आजही प्रवाशांना आपलीशी वाटत आहे.
निखिल म्हात्रे
अलिबाग : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी आजही प्रवाशांना आपलीशी वाटत आहे. खेडोपाड्यात, डोंगराच्या कुशीत दुर्गम भागात सुखरूप प्रवाशांना घेऊन जाणारी ही लालपरी आजही त्याच उमेदीने प्रवाशांच्या सेवेसाठी झटत आहे; परंतु एसटी बस सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकांना रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी राहण्यासाठी गैरसोय होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चालक-वाहकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्याची गरज आहे. मात्र, या महत्त्वाच्या घटकाकडे प्रशासन आणि सरकारकडून सातत्याने दुर्लक्षच होत असल्याने नाराजीचा सूर आहे.
एसटी बस ज्या गावात रात्रीच्या वस्तीला असते, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत प्रशासनाने चालक, वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते. काही ठिकाणी शाळेत व इतर ठिकाणी राहण्याची सुविधा केली जाते. अथवा नातेवाइकांकडे झोपण्याची सोय चालक, वाहकांची होत असते. मात्र, अनेक वेळेला चालक, वाहक यांना झोपण्यासाठी एसटी बसचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एसटी बसचालक व वाहक यांच्या या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी चालक, वाहकांना राहण्याची सुविधा ही गावातील स्थानिक प्रशासनाने करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात नाहीत. पुन्हा याबाबत आम्ही पत्रव्यवहार करू, अशी प्रतिक्रि या रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणच्या एसटी आगारातील चालक-वाहकांची राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सोयी-सुविधांची वानवा आहे. नोकरी करायची असल्याने निमूटपणे चालक-वाहक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रवासी वाहतूक करण्याच्या सुविधा आधुनिक काळात वाढल्या आहेत. रिक्षा, मिनीडोअर, प्रवासी कार यामुळे प्रवाशांना त्वरित प्रवास करण्याच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. मात्र, या प्रवासी वाहतूक सुविधा ठरावीक वेळेपर्यंत प्रवाशांना दिल्या जातात. राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने इतबारे काम करत आहेत. एसटी बस ही गावागावांत शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्याच्या इच्छित स्थळी सुरक्षित सोडण्याची सुविधा देत असते. चालक व वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन जाऊन त्या ठिकाणी रात्रीची वस्ती करत असतात. त्या ठिकाणीही कोणत्याच सुविधा नसल्याने त्यांना रात्र खितपत काढावी लागत आहे.
।एसटीतच काढावी लागते रात्र
जिल्ह्यात साधारण १५० ते २०० एसटी बसचालक, वाहक हे शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला असतात. मात्र, वस्तीला घेऊन गेलेल्या चालक व वाहकांना वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही, त्यामुळे चालक व वाहकांना एसटीमध्येच आराम करावा लागतो. एसटी बसमध्ये झोपत असले तरी मच्छरांचा त्रास, बिना पंख्याचा वारा, अशा असुविधेमध्ये चालक-वाहकांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृहाचीही पंचायत होत असते. त्यामुळे चालक व वाहकांना रात्रीच्या वस्तीला गेल्यावर असुविधेला सामोरे जावे लागते.
।चालक-वाहकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ते सातत्याने झटत असतात. चालक-वाहकांसाठी जिल्ह्यात अस्तित्वात असणाºया आगारातील विश्रांतिगृहाची अवस्था बिकट आहे. त्यामध्ये त्यांना राहावे लागते. तसेच वस्तीवर गेलेल्यांना तीही सुविधा मिळत नाही, हे अतिशय वाईट आहे. प्रशासन आणि सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांगल्या सुविधा मिळाल्या तरच त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास मदत होईल.
-डॉ. सचिन पाटील,
अध्यक्ष, रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट