पाली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसची दुरवस्था झाली आहे. याचा प्रत्यय पाली बसस्थानकात नुकताच आला. पाली-अलिबाग ही एसटी पाली स्थानकात आली त्या वेळी बसला दरवाजाच नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन या बसमधून प्रवास करावा लागला.
परिवहन महामंडळ तसेच स्थानिक डेपोकडून एसटी बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दरवाजा नसलेल्या एसटी बसेस सेवेत कार्यरत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाने केला आहे. दरवाजा नसलेल्या बसमधून नाइलाजास्तव जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ विद्यार्थी व प्रवाशांवर ओढवली आहे. याबाबत वाहतूक नियंत्रक जी. बी. कोळी यांची प्रतिक्रि या घेतली असता दरवाजा नसलेली एसटी डेपोतून कशी पाठविण्यात आली याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या दरवाजा नसलेल्या बसमधून प्रवासी बाहेर पडून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. एसटी बसच्या देखभालीच्या अभावाने एसटीची दुरवस्था झालेली आहे. दरवाजा नसलेल्या एसटी कार्यरत राहणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. एसटी महामंडळाने यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात घडल्यानंतर इलाज करण्यापेक्षा, अपघात घडू नयेत यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी दिली.