महाड : खेडहून मुंबईकडे निघालेली एसटी शनिवारी सकाळी ९च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक करंजखोल गावात आली असता दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात पलटी झाली. या अपघातात चालक वाहकांसह १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर महाड ग्रमीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खेड आगारातून सकाळी ६.१५वा. सुटणारी खेड-मुंबई ही बस (एम एच १४ बीटी २७५७) घेऊन, चालक गजानन बाळाजी पवार (३१, रा.खेड) व वाहक आप्पासाहेब मारछती दोलताडे शनिवारी मार्गस्थ झाले. सकाळी ९च्या दरम्यान बस करंजखोल गावात आली असता, एक दुचाकीस्वार महामार्गावर आडवा आला. त्याला वाचवण्यासाठी चालकाने बस डाव्या बाजूस घेतल्याने ती रस्त्याच्या खाली उतरवली. मात्र, साइड पट्टीवरून आलेल्या चिखलातून गाडी घसरल्याने खाली शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात एसटी बसच्या पुढील काचा फुटल्या. चालक गजानन पवार, वाहक आप्पासाहेब दोलताडे यांसह प्रमोद वसंत कदम (५८, रा. कुमार साई खेड), पांडुरंग कोंडीराम मोरे (३४ ढवळे, पोलादपूर), हालीमा मुश्ताक सुर्वे (६५, खेडे), दगडू कामू पवार, (कशेडी खेड,) मारु ती गौरू चिकणे (६४, बोरीवली), सुशीला विठ्ठल उतेकर, वैभव सुरेश लाड ( २७, खेड), लक्ष्मी पांडुरंग उतेकर (७०, पोलादपूर), हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहक आप्पासाहेब दोलताडे हे बेशुद्धावस्थेत असून बसमधून एकूण २१ प्रवासी होते. महाड एस.टी. आगारातून या प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आगारातील वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी दिली.
खेडहून मुंबईकडे निघालेल्या एसटीचा महाडमध्ये अपघात, १० जण किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:57 AM