रोहा : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीचे कारला ओव्हरटेक करताना ब्रेक निकामी झाल्याने बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महामार्गावर तळवली गावाजवळ मध्यरात्री घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेने कोलाड विभागासहित रोहा-माणगाव तालुका हादरला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण एसटी आगारातून एमएच १४ बीटी ३८८७ क्रमांकाची जयगड-मुंबई ही एसटी बस मंगळवारी (१२ एप्रिल) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे भरधाव वेगाने रवाना होत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील रोहे-कोलाडजवळील तळवली गावाजवळ आल्यावेळी बसचालक शाहुराज बाजीराव गवारे (४०, रा. वांजखाडा, जि. लातूर), हा एसटीसमोरील कारला ओव्हरटेक करीत असताना अचानक एसटी चालकाने ब्रेक दाबला. परंतु एसटीचा ब्रेक न लागल्याने एसटीची कोलाडकडून माणगावकडे जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०६ एबी ६०३५) जोरदार धडक बसली. जोरदार धडक बसल्याने या भीषण अपघातात माणगाव तालुक्यातील दहिवली गावातील आशिष पिसाळ, सचिन शिर्के, सुरेश तळवटकर, संदेश दाभणे हे चौघे जण जागीच ठार झाले.मोटारसायकल अपघातात एक ठारमहास (दासगाव) : महाड तालुक्यातील टोळ आंबेत मार्गावर मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आंबेत दिशेला भरधाव वेगाने जाणारी मोटारसायकल वाळू घेऊन जाणाऱ्या एका डंपरवर धडकली. या अपघातात मोटारसायकलस्वार नजीम सलीम शेख (२२, रा. झारखंड) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी माणगाव येथे नेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मृत घोषित के ले. अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात आहे. अपघातात दोन ठारवावोशी : खालापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र .४ वरून खोपोली बाजूकडून येणाऱ्या स्कुटीवरील हाळगाव येथील दोघा जणांना कार्ला देवीच्या दर्शन घेवून येणाऱ्या कारने आंजरूण फाट्याजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील दोघे ठार झाल्याची घटना सायंकाळी ४.३० च्या दरम्यान घडली. खोपोली बाजू हाळगावाकडे स्कुटीवरून अंबू क्षीरसागर (५५) व गफूर दाऊद दुस्ते (५७) हे जात असताना कार्ल्याहून पनवेल बाजूकडे वेगात जाणाऱ्या आय ट्वेंटी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मागून स्कुटीला धडक दिली. अपघातात क्षीरसागर हे जागीच ठार झाले तर दुस्ते यांचा वाशी येथे नेताना मृत्यू झाला.
तळवलीजवळ एसटीची रिक्षाला धडक
By admin | Published: April 14, 2016 12:11 AM