एसटी महामंडळाचे आधुनिक तंत्रज्ञान प्रवाशांसाठी त्रासाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:24 AM2018-08-23T01:24:15+5:302018-08-23T01:24:35+5:30
महाराष्ट्रातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारी एसटी आधुनिकीकरणाची कास पकडत मार्गक्रमण करताना दिसत आहे; परंतु हे मार्गक्रमण एसटी कर्मचारी व जनता यांना त्रासदायक ठरू लागले आहे
म्हसळा : महाराष्ट्रातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारी एसटी आधुनिकीकरणाची कास पकडत मार्गक्रमण करताना दिसत आहे; परंतु हे मार्गक्रमण एसटी कर्मचारी व जनता यांना त्रासदायक ठरू लागले आहे. श्रीवर्धन एसटी आगारात दाखल झालेल्या शिवशाही बसेस सदैव अस्वच्छ असतात. आगारात दोन खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय नसतो. शिवशाही बसेसवर कामगिरी बजावणाऱ्या चालकास अतिशय कमी दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यामुळे अपघाताची भीती प्रवाशांच्या मनात असते. दररोज एक तरी शिवशाही काही तरी कारणास्तव रद्द केली जाते. विद्यमान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांच्या हितासाठी चालू केलेली सेवा विनाकारण सर्वसामान्य माणसाला त्रासदायक ठरत आहे. शिवशाहीसंदर्भात एसटी अधिकारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत.
एसटी महामंडळात वाहकाकडील ट्रायमॅक्स मशिन सदैव समस्यांनी ग्रासलेली असते. बॅटरी उतरणे, मशिन बंद पडणे, प्रिंट खराब येणे, मशिनची बटणे तुटलेली असणे, ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे वाहकावर मानसिक त्रास निर्माण होत आहे. पयार्याने प्रवासी व वाहक यांच्यामध्ये नित्याचे वादविवाद झडत आहेत. एसटीचे वाहकसुद्धा सदरच्या तिकीट मशिनला प्रचंड त्रासले आहेत; परंतु ट्रायमॅक्स कंपनी व एसटीचे वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. करोडो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे तिकीट मशिन महामंडळाने कसे खरेदी केले? असा प्रश्न जनता विचारत आहे.
तसेच, रायगड जिल्ह्यातील आठ आगारांच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये महिन्याला एसटी महामंडळ खर्च करत आहे; परंतु एसटी डेपोत स्वच्छता कुठेच आढळत नाही. एसटी स्टँड, कर्मचारी विश्रांतीगृह, प्रवासी स्वच्छतागृह येथे कुठेच स्वच्छता दिसत नाही. पर्यायाने महामंडळाने खर्च केलेला पैसा गेला कुठे? हा प्रश्न निर्माण होत आहे.
रायगड जिल्ह्याच्या ज्या आगारातील वाहकांच्या तिकीट मशिनबाबत तक्रार मिळेल त्या आगाराची अधिकाºयांकडून चौकशी करण्यात येईल व वाहकांनी सदर तिकीट मशिन बंद पडल्यास सोबत असणाºया तिकीट ट्रेमधून तिकीट देणे बंधनकारक आहे. तसे तक्रार असलेल्या आगारातून वाहकांकडून होते किंवा नाही याची देखील चौकशी केली जाईल.
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, पेण, रायगड
सदर तिकीट मशिन्स जुन्या झाल्या असल्याकारणामुळे तसेच खराब वातावरणामुळे काही वेळेस तिकीट रक्कम मशिनमध्ये जमा होते, परंतु तिकिटावर काहीही छापून येत नाही. पर्यायाने त्याच तिकिटावर सदर वाहकास टप्पा व रक्कम लिहून द्यावी लागते, मात्र मशिन पूर्णपणे बंद पडल्यास सोबत असणाºया पारंपरिक तिकिटांमधून सदर वाहकांनी तिकीट देणे बंधनकारक आहे. सदर बाबतीत याची पूर्तता होते किंवा नाही याची चौकशी केली जाईल.
- रेश्मा गाडेकर, आगार प्रमुख,
श्रीवर्धन आगार