खडी उखडल्याने अपघातामध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:37 AM2019-01-21T00:37:28+5:302019-01-21T00:37:36+5:30
नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झाली होती.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडी टाकण्यास सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या काही भागांत खडी टाकण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काम बंद असल्याने अनेक ठिकाणी खडी रस्त्यावर आल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. अवसरे येथे अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने रस्ते दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे महिनाभरापूर्वी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली आणि कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम सुरू झाले; परंतु जसे आंदोलन संपले तसे रस्त्याची कामे थंडावली. अनेक रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम बंद पडले आहे. याकडे बांधकाम विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा कर्जत तालुक्याला खड्ड्यांनी आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांनी ग्रासले आहे, त्यामुळे सर्वसामन्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नेरळ-कळंब या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावर खडी टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र, हे काम किती रुपयांचे आहे, कोणत्या ठेकेदाराकडून होत आहे, त्यासाठी अंतिम तारीख काय या बाबत सूचना फलक लावण्यात आलेला नाही. गेल्या आठवड्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले. तर दोन दिवसांपूर्वी उंबरखांड येथील जनार्दन दळवी यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने बदलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक दिवस उलटूनही रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करण्यात आली नाही. अपुºया डांबराअभावी खडी उखडल्याने पुन्हा येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
>ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
नेरळ- कळंब रस्त्यावरील बिरदोले आणि अवसरे भागात खडी टाकल्यावर डांबर कमी प्रमाणात टाकण्यात आले आहे. निकृष्ट कामामुळे अवघ्या काही दिवसांत खडी पुन्हा रस्त्यावर आली आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.
ठेकेदारांच्या मनमानी कारभाराकडे बांधकाम विभागही लक्ष देत नाही, त्यामुळे या पूर्ण भागातील रस्ता नव्याने आणि दर्जेदार बनविण्यात यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बिरदोले ग्रामस्थांच्या वतीने दिनेश कालेकर यांनी दिला आहे.