कोकण विभागात मनरेगाच्या २,१७0 कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:27 AM2020-04-24T01:27:12+5:302020-04-24T01:27:27+5:30
८ हजार ९0८ मजुरांना रोजगार : अटी-शर्तींचे पालन करण्याचे आदेश
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा अंतर्गत २ हजार १७0 कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ८ हजार ९0८ कामगारांनी हजेरी लावल्याची माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
कोकण विभागातील जिल्ह्यांतर्गत कृषी, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन झोन क्षेत्रांत लघुउद्योग, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींच्या अधीन राहून कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर कोकण विभागांतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. यात रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नालेसफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोट्या नद्यांवरील मोऱ्यांची दुरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. मनरेगाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कामांमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे दौंड यांनी स्पष्ट केले आहे.
विविध ठिकाणी बांधकामांची झाली सुरुवात
कोकण विभागांतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना सुरुवात झाली आहे.