- मधुकर ठाकूर
उरण : उरण - पनवेल या पारंपरिक मुख्य रस्त्यावरील तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेली एसटी बस सेवा पुर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली सिडको विरोधात आंदोलन छेडले आहे.कडकडीत उन्हात सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे येथील महिला चारही गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले आहेत.
उरण - पनवेल राज्य महामार्गावरील खाडी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील एसटी आणि एनएमएमटीची बस सेवा आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे बोकडवीरा, फुंडे,डोंगरी व पाणजे या चारही गावातील विद्यार्थी , कामगार, वयोवृद्ध नागरीकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जेएनपीटी कामगार वसाहती जवळ किंवा द्रोणागिरी नोड आणि उरणमध्ये बस साठी ये -जा करावी लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हा पूल पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्याकडे होता. त्यानंतर १ सप्टेंबर २०२३ पासून सिडकोकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. तर सहा महिन्यापूर्वीच सिडकोने या पुलाच्या मजबुतीचे काम सुरू केले आहे. मात्र तकलादू कारणे देऊन पुलाचे काम करणारा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत आहे. याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. या मार्गावरील अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट गेट बसविण्यात आले आहेत. या गेटचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. यामध्ये काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी बोकडवीरा येथील एका लहान मुलीचा व तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.
या घटनेनंतर बोकडवीरा ग्रामस्थांनी सिडकोच्या विरोधात आंदोलनही केले होते. त्यावेळी सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील अधिकाऱ्यांनी हा पूल लवकरात लवकर सुरू करण्याचे ही आश्वासन दिले होते. मात्र त्याचीही अद्यापही अमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळे सिडको विरोधात एल्गार पुकारत आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पूल दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनाला बोकडवीरा सरपंच अपर्णा पाटील, पाणजे सरपंच लखपती पाटील,फुंडे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, कामगार नेते भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे,किसान सभेचे संजय ठाकूर,रामचंद्र म्हात्रे,डीवाय एफआयचे राकेश म्हात्रे, महिला संघटनेच्या प्रमिला म्हात्रे, सविता पाटील, कुसुम ठाकूर,कुंदा पाटील आदी अनेकजण उपस्थित होते.