कर्जत : पायलट प्रकल्पानंतर सहा महिने झाले ई रिक्षा सुरू होत नाहीत. त्यामुळे माथेरानकरांत संताप असून पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्याची पायपीट थांबत नसल्याने त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी संनियंत्रण समितीने अहवाल न्यायालयात सादर केला नाहीतर मी स्वत: निर्णय घेऊन ई रिक्षा सुरू करेल, असे आश्वासित केले होते. मात्र, तरीही ही सेवा सुरू झालेली नाही. त्या जिल्हाधिकारी हे सनियंत्रण समितीत मानद सचिव आहेत. त्यामुळे आता पालकांनी त्यांनाच निवेदन दिले असून १२ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये वाहतूक हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, माथेरानला तो डावलला जातो. सर्वोच्च न्यायालयाने १२ मे २०२२ रोजी माथेरानला ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले. तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टदेखील यशस्वी राबविला. १२ मेच्या आदेशात स्पष्ट केले होते की, पायलट प्रोजेक्टनंतर ई रिक्षा कशा पद्धतीने सुरू करणार याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी. ई रिक्षा बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत, असे असताना ही सेवा बंद आहे.
पालकांचा आंदोलनाचा निर्धार ई - रिक्षा तत्काळ सुरू करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालक चंद्रकांत सुतार, केतन रामाने, आदेश घाग, संतोष पवार, आदित्य भिलारे, नंदू चव्हाण, शैलेश भोसले, हरिभाऊ लबडे ही मंगळवार, १२ सप्टेंबरपासून श्री राम चौक येथे संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाला बसणार आहेत.