भात लावणीची लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:13 AM2018-06-29T03:13:59+5:302018-06-29T03:14:03+5:30
चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत.
अलिबाग : चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र १ लाख ५ हजार हेक्टर होणे कृषी विभागास अपेक्षित आहे.
भात शेतीच्या मशागतीचे उलकटणी, राब पेरणी असे महत्त्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता सध्या सर्वत्र चिखलणी सुरू झाली आहे. या दरम्यान पिकाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्यादृष्टीने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी खताचीही मुबलक उपलब्धता करून देण्यात आली आहे. लावणीनंतरही चाळीस दिवसात दोनदा नत्राची मात्रा दिली जाते. यासंदर्भात शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे.
शेतकºयांना बियाण्यांची उपलब्धता यापूर्वीच करून देण्यात आली आहे. राबांची उगवण चांगली झाल्याने भात रोपे देखील लावणी योग्य झाली आहेत. खताचा व कीटकनाशकांचा साठा शेतकºयांच्या मागणीनुसार उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. भाताच्या काही जाती या ४८ दिवसांत, काही ५२ तर काही ६२ दिवसांत तयार होतात. त्यादृष्टीने शेतकरी आपल्या शेती कामांचे नियोजन करीत असतात.
भाताबरोबर नागली आणि तुरीची लागवड
जिल्ह्याच्या खरीप हंगामासाठी एकूण १ लाख १४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली राहणार असून भात पेरणी १ लाख ५ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.त्या खालोखाल ७ हजार १२८ हेक्टरवर नागली, ९७५ हेक्टरवर इतर तृणधान्य, ९०६ हेक्टरवर तूर तर १७३ हेक्टरवर इतर कडधान्य लागवड नियोजित आहे.
खते-बियाण्यांची उपलब्धता
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १५ हजार १५५ क्विंटल भात बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली होती तर २४ हजार ६०० मेट्रिक टन इतक्या रासायनिक खताची उपलब्धता शेतकºयांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. तसेच ३४ हजार ९०० लिटर्स कीटकनाशके व बुरशी नाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे.