आगरदांडा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता या लॉकाडाऊनमध्ये शिथिलता आल्याने सात महिन्यांपासून बंद असणारी हॉटेल त्यानंतर रिसॉर्ट, बार चालू केल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तरी पर्यटक वाढण्यासाठी ऐतिहासिक जंजिरा किल्ला खुला करणे आवश्यक आहे. तशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.मुरूड तालुक्यातील किनारपट्टी ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखली जाते. स्वच्छ किनारे, प्रसिद्ध किल्ले, आणि तीर्थस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु कोरोना महामारीमुळे पर्यटनावर आधारित हॉटेल, रिसॉर्ट आणि त्यावर आधारित इतर व्यवसाय गेल्या सात महिन्यांपासून ठप्प होते. त्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळे यांसारख्या समस्यांमुळे मोठ्या आर्थिक संकटात व्यावसायिक सापडला आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्याकरिता ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करणे आवश्यक आहे. दिवाळी सणापूर्वी जंजिरा किल्ला खुला झाला तरच दिवाळी सुटीतील पर्यटनाचा हंगाम बहरेल आणि झालेले नुकसान काहिसे भरून काढता येईल. तरी खासदार सुनील तटकरे यांनी याचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर किल्ला पर्यटकांसाठी खुला करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत (बाबू) सुर्वे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने येथील हॉटेल चालू केले आहे; परंतु किल्ला खुला न केल्याने येणारे पर्यटक मुरूडमधूनच परत जातात. किल्ला लवकरात लवकर खुला केला तरच हॉटेल व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. पर्यटकांना किल्लात नेण्याकरिता शिडाच्या होड्या पुन्हा धावू शकतात; त्याचबरोबर किल्ल्याची माहिती देण्याकरिता गाईड सेवेद्वारे स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकतो.- जावेद कारभारी, होडी मालकराज्य सरकारने सोमवारपासून हॉटेल, रिसॉर्ट सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जोपर्यंत मुरूड-राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येत नाही तोपर्यंत येथील व्यावसायिकांना चांगले दिवस येणार नाहीत. राज्य सरकारने याचा विचार करून दिवाळीच्या आत ऐतिहासिक जंजिरा किल्ला खुला करून दिला तर येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळू शकतो. - सूरज मिठाग्री, हॉटेल मालक
‘जंजिरा‘ पर्यटकांसाठी सुरू करा; स्थानिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 11:45 PM