पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू; ९९ हजारांपैकी १५ हजार विद्यार्थी हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:23 AM2021-01-28T00:23:35+5:302021-01-28T00:24:01+5:30
रायगडमधील ८०६ शाळा सुरू;
आविष्कार देसाई
रायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झाल्याने जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या १९३० शाळांपैकी ८०६ शाळा सुरू झाल्या आहेत. ९९ हजार १६३ विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त १५ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर तब्बल ८३ हजार ७८० विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी दांडी मारली. अद्यापही पालकांमध्ये काेराेनाबाबतची भीती दूर झाली नसल्याचे दिसून येते.
मार्च २०२० पासूनच जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर काेराेनाचा आलेख वाढतच गेला. त्यामुळे जून महिन्यात सुरू हाेणारे शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. आधी नववी ते बारावी आणि २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काेराेनाचा हाेणारा प्रसार बऱ्यापैकी थांबलेला आहे. तसेच आता काेराेनावरील लसदेखील आलेली आहे. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पहिल्या दिवशी म्हणावी तशी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली नाही. पाचवी ते आठवीमधील विद्यार्थी वयाने लहानच आहेत. त्यामुळे काेराेनाबाबतच्या नियमांबाबत त्यांच्या मनात तेवढी जागृती आणि गांभीर्य नसावे. त्यामुळे पालक आपापल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे आजच्या संख्येवरुन दिसून येते.
पहिल्याच दिवशी मैत्रीणी भेटल्या आम्ही शाळेत मज्जा केली. ऑनलाइन शिकून कंटाळाला आला हाेता. प्रत्यक्षात शिक्षकांना पाहूनही आनंद झाला. अजूनही आमच्या काही मैत्रिणी शाळेत आलेल्या नाहीत.- विधी पाटील, विद्यार्थीनी
शाळेचा पहिला दिवस असल्याने कालपासूनच मी वाट बघत हाेताे. आज ताे दिवस उजाडला. सर्व शिक्षक भेटले, मित्र भेटले मज्जा आली. काेराेनाबाबतचे नियम शाळेत पाळले जात हाेते.- हर्ष पाटील, विद्यार्थी
पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत होता. पहिल्याच दिवशी ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. पालकांचे संमती पत्रक ही घेतले गेले. - सुप्रिया पाटील, नागाव हायस्कूल
पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह चांगलाच हाेता. काेराेनाचे सर्व नियम पाळण्यात येत आहेत. मुलांनाही काेराेबाबत माहिती आहे. त्यामुळे तेही जागरुक आहेत. अद्यापही काही पालकांनी संमतीपत्रे दिलेली नाहीत- संध्या पाटील, चिंचाेटी