शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ
By admin | Published: June 6, 2017 12:16 AM2017-06-06T00:16:41+5:302017-06-06T00:16:41+5:30
रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी : शिवछत्रपतींच्या मूर्तीवर आज सुवर्णनाण्यांचा अभिषेक
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क --रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर आज, मंगळवारी दिमाखात साजरा होत आहे. सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गड पुजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता राज सदरेवर मुख्य सोहळा होणार आहे.
सोमवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे गडावर पुष्पवृष्टींनी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांंनी शिरकाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले. यानंतर ढोल ताशाच्या गजरात होळीच्या माळावर जल्लोषी स्वागत झाले. येथे मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके झाली.
त्यानंतर नगारखान्याच्या प्रवेशद्वारावर समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते व शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक गिरीष जाधव, स्थानिक प्रतिनिधी रघुवीर देशमुख, पंचक्रोशीतील गावकरी यांच्यासह समिती व महाराष्ट्र शाहिर परिषदेचे सदस्य आणि इतिहासप्रेमींच्या हस्ते गडपूजन, अश्वपूजन, शस्त्रास्त्रपूजन आदी कार्यक्रम झाले.
यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी...जय शिवाजी... संभाजीराजे छत्रपती यांचा विजय असो... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भगवे ध्वज, भगव्या टोप्या व भगवे टी शर्ट परिधान केलेल्या शिवभक्तांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चटके देणारे ऊन, मुसळधार पाऊस अन धुके अशा वातावरणात सोहळ्याचा उत्साह द्विगुणीत झाला.
संभाजीराजेंनी तासाभरात
केला रायगड सर
प्रतिवर्षीप्रमाणे रोप-वे ने न जाता संभाजीराजे छत्रपती यांनी पायी रायगड सर केला. दुपारी ४ वाजता, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चित्त दरवाजाने रायगडावर चढाईस सुरुवात केली. महाद्वार येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते महाद्वारावर तोरण चढविण्यात आले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
गौरव शिवभक्तांचा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमीत्ताने रायगडावर विविध कार्यक्रमांर्गत आज दुर्ग स्वच्छता अभियानात उत्सफूर्तपणे सहभागी शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था-संघटना आणि व्यक्तींचा विशेष गौरव संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीष जाधव आणि
आदर्श हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रमुख
उपस्थिती होती.
त्यानंतर राज्यभरातून आलेल्या शिवशाहिरांनी आपल्या पोवाडा गायनाने उपस्थितांची मने जिंंकली. यानंतर गडावरील स्थानिक महिलांना युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्यावतीने पाठविण्यात आलेल्या साडी-खणाने सन्मानित करण्यात आले.
सत्काराच्या सोहळ्यानंतर शिवशाहिर शहाजी माळी, दिलीप सावंत, आझाद नायकवडी (सर्व कोल्हापूर), सुरेश जाधव (औरंगाबाद), राजेंद्र कांबळे (अकलूज) यांनी ‘ही रात्र शाहिरांची...’ हा कार्यक्रम सादर करून उपस्थितांसमोर शिवशाहिचा इतिहास उभारला.ओंकार व्यवहारे या बाल शाहिरानेही सादरीकरण करून मने जिंकली.
इतिहासप्रेमी संघटनांकडून प्रबोधन...
शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर जमलेल्या शिवभक्त व इतिहाप्रेमींकडून प्रबोधनाची मोहिमही राबविण्यात आली. वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन तर्फे शिवभक्तांना १ लाख पाण्याचे पाऊच मोफत वाटण्यात आले. नाशिक जिल्हा शिवकार्य गडकोट मोहिमेतर्फे ‘किल्ले वाचवा’साठी जागृती करण्यात आली. कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालय पर्वत आणि सह्याद्री रांगेतील गडकोटांवरू अभिषेकासाठी जल आणण्यात आले होते.
आज मुख्य सोहळा...
शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा मंगळवारी दि. ६ रोजी, सकाळी १० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता, नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर इचलकरंजी येथील शिवभक्तांकडून भव्य भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. अभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर पारंपारिक जवाजम्यासह शिवछत्रपती, जिजाऊ यांच्या पालखी मिरवणूका निघतील. यानंतर जगदिश्वर मंदीर दर्शन आणि शिवसमाधी पूजनाने पालखी सोहळ्याची सांगता होईल. अन्नछत्राचे सोहळ्याची सांगता होणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर मंगळवारी दिमाखात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सोमवारी रायगडावर आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकावेळी ढोल वाजविला. दुसऱ्या छायाचित्रात मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांकडून वाहव्वा मिळविली.