विद्यार्थ्यांसाठी मुरुड-मांदाड-तळामार्गे एसटी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:42 AM2020-02-17T00:42:29+5:302020-02-17T00:42:54+5:30
विभाग नियंत्रकांना निवेदन : जी. एम. वेदक कॉलेजच्या प्राचार्यांची मागणी
बोर्ली-मांडला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुरुड आगारातर्फे मुरुड-मांदाडमार्गे तळा-माणगाव स्वारगेट एसटी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी तळा येथील जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य डॉ. विजय सरोदे यांनी विभाग नियंत्रक-पेण (रायगड) यांंच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुरुड-तळा-माणगांव-स्वारगेट परतीसह एसटी सेवा सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. तळा येथे इंजिनीयरिंग कॉलेज, विज्ञान, कला व वाणिज्य उच्चशिक्षणाची सोय आहे. मुरुड येथील विद्यार्थी तळा येथे शिक्षणासाठी येऊ इच्छितात; परंतु केवळ दळणवळणाची सुविधा नसल्याने त्यांना अन्य पर्याय शोधावा लागतो. याबाबत मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील, सभापती प्रमोद भायदे, अशोक धुमाळ, मेघाली पाटील, तसेच रायगड वेल्फेअरचे राशीद फहिम यांच्याशी विचार विनिमय केला. या वेळी एसटी सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. मुरुड हे पर्यटन स्थळ विकसित होत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच दक्षिण रायगडमधील प्रवाशांना मुरुडकडे येण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरू शकते. पेण येथील विभाग नियंत्रकांनी लक्ष देऊन मुरुड-तळा-माणगाव-स्वारगेट सकाळी ७ वाजता व परतीसाठी स्वारगेटहून दुपारी २ वाजता अशी एसटी सेवा सुरू करण्याची मागणी प्राचार्य डॉ. विजय सरोदे यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुरुड आगारप्रमुख, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.
या भागातून मुरुड व तळा तालुक्यातून सुमारे ५० विद्यार्थी तळा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ये-जा करीत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आगारप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या मार्गावरून एसटी सेवा सुरू करण्यात किमान २५ विद्यार्थी आवश्यक आहेत. होळी सणासाठी तीन जादा गाड्या सोडण्यात येणार असून, मुरुड-तळा-स्वारगेट ही सेवा उपलब्ध होण्यासाठी तसा प्रस्ताव विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.