पळस्पे-हमरापूर मार्गावर डांबरीकरण सुरू

By Admin | Published: July 29, 2016 02:48 AM2016-07-29T02:48:27+5:302016-07-29T02:48:27+5:30

गोवा राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे -पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्याची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस आळा

Start of tarpaulin on the Palaspe-Harmarpur route | पळस्पे-हमरापूर मार्गावर डांबरीकरण सुरू

पळस्पे-हमरापूर मार्गावर डांबरीकरण सुरू

googlenewsNext

- जयंत धुळप, अलिबाग

गोवा राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे -पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्याची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस आळा घालण्याकरिता या महामार्गावरील खड्डे बुजवून महामार्ग सुरक्षित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असल्याची कबुली देवून, दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. याबाबतची माहिती कोकण परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करून तो वाहतुकीस सुरक्षित करणे अनिवार्य आहे. संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर आणि महावीर या दोन कंपन्यांचे वरिष्ठांची बैठक घेवून निर्णय घेण्याचा विश्वास बुरडे यांनी अलिबाग दौऱ्यात पत्रकारांना दिला होता. त्यानुसार बुधवारी बुरडे यांच्या कार्यालयात संबंधितांची बैठक झाली.
गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेचे गांभीर्य बुरडे यांनी संबंधितांसमोर ठेवले. चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे अशक्य असून तशी अपेक्षाही नाही. हा महामार्गाचा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला असल्याने त्याची दुरुस्ती करुन तो वाहतुकीकरिता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. ही दुरुस्ती प्राधिकरणाने करायची वा कंत्राटदार कंपन्यांनी करायची हा या दोघोंमधील अंतर्गत निर्णयाचा मुद्दा आहे. महामार्ग तत्काळ दुरुस्त होवून तो वाहतुकीस सुरक्षित होणे अपेक्षित असल्याचे बुरडे यांनी बैठकीत सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक प्रशांत हेगडे, सुप्रीम कंपनीचे अभिषेक अग्रवाल, कार्यकारी अभियंता एस.के.सुरवसे, महाराष्ट्र प्रोजेक्टचे वरिष्ठ व्यवस्थापक जी. एस. तलवार, वरिष्ठ अभियंता अहमद कुरेशी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील उपस्थित होते.

येत्या पंधरा दिवसांत दुरुस्ती अपेक्षित
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या कंत्राटदार कंपन्यांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळपासूनच गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामास प्रारंभ केला आहे. गुरुवारी पळस्पे (पनवेल) ते हमरापूर (पेण) या टप्प्यातील खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण करुन रस्ता सुस्थितीत आणण्याचे काम सुरु आहे. येत्या पंधरा दिवसांत इंदापूरपर्यंतच्या महामार्गाची दुरुस्ती अपेक्षित आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीकरिता ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा, जनसामान्यांचा रेटा, कोकण परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक बुरडे यांचा पुढाकार यामुळे दुरुस्ती कामास प्रारंभ झाला आहे.

विटांचा वापर ठरणार निरुपयोगी
हमरापूर येथे खड्डे बुजवण्याकरिता विटांच्या तुकड्यांचा वापर करण्यात येत आहे. सततची वाहतूक आणि पाऊस यामध्ये अशा प्रकारे खड्डे बुजवण्याचे काम केल्यास ते टिकाव धरु शकणार नाही. या ठिकाणी देखील काँक्रीट किंवा हॉटमिक्स अस्फाल्टचा वापर करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केली.महामार्ग दुरुस्तीबाबत जोग यांनी मुख्यमंत्र्यांपासून संबंधितांना निवेदन दिले आहे.

Web Title: Start of tarpaulin on the Palaspe-Harmarpur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.