रायगड : केंद्र सरकारने पुरवठा केलेली कोरोनावरील लस पूर्ण सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी काेणतीही भीती बाळगू नये. सुरुवातीला आराेग्य कर्मचाऱ्यांना लस टाेचण्यात येणार आहे. त्यानंतर, सर्वसामान्यांसाठी ती उपलब्ध हाेणार आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय येथे ‘कोविशिल्ड’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुहास माने यांना पहिली लस टाेचण्यात आली.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथील २ अशा ४ केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी ९ हजार ५०० लसी प्राप्त झाल्या आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस, तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने कळविले आहे. राज्याला कोविशिल्ड व्हॅक्सिनचे ९ लाख ६३ हजार डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे २० हजार डोसेस प्राप्त झालेले आहेत. सर्व जिल्ह्यांपर्यंत ते पोहोचविण्यात आले आहेत.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफचे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
१०० जणांचे लसीकरण पूर्ण - केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार, नोंदणी झालेल्या सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टर्स, नर्सेस अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. - अलिबाग सरकारी रुग्णालयात नाेंदणी केलेल्या १०० पैकी २७ जणांना लस टाेचण्यात आली, पेण सरकारी रुग्णालयात १०० पैकी २१, पनवेल तालुक्यातील एमजीएम रुग्णालयात १०० पैकी ९५ आणि जी.डी.पाेळ फाॅउंडेशन (वाय. एम. काॅलेज) १०० पैकी १०० जणांना लस टाेचण्यात आली. एकूण २६३ जणांना लस टाेचण्यात आली.- या लसीचे २ डोस चार आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवणार आहे.