आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
By राजेश भोस्तेकर | Published: October 31, 2022 02:08 PM2022-10-31T14:08:02+5:302022-10-31T14:09:00+5:30
निविदा पुढे ढकलणे कामाची चौकशी करण्याचे पालकमंत्रीचे संकेत
अलिबाग : आंबेत पुलाच्या कामाची निविदा पुढे पुढे ढकलली जात आहे. याबाबत मला चौकशी लावावी लागेल आणि श्रेय वादावरून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल तर ते चुकीचे आहे. टेंडर प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. जनतेची गैरसोय होत आहे. याचे उत्तर काय असा जाब पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. टेंडर प्रक्रिया आज पूर्ण करून आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा. जर तर वर कोणाचा विश्वास नाही. कामाचा नारळ फोडण्यास आम्ही येणार असल्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या पुलासाठी दहा कोटींचा खर्च होणार आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या दूरदृष्टी तून निर्माण झाला होता. त्यामुळे रत्नागिरी ला वळसा न घालता प्रवाशाचा वेळ वाचत होता. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून पुल हा नादुरुस्त झाला असून साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे.
आंबेत पुल बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. शासन आणि प्रशासनाला यामुळे प्रवाशाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आंबेत पुलाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार आज ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात आंबेत पुलाबाबत अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी फैलावर घेतले. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
आज निविदा उघडली जाणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. त्यावेळी काम पंधरा दिवसात नाही तर आठ दिवसात ठेकेदाराने काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेत पुलाचा प्रश्न पालकमंत्री याच्या निर्देशानुसार लवकर सुटेल आणि प्रवाशाची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
नवीन पुल बांधला गेला असता....
आंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून सुरू असून अपूर्णच आहे. दुरुस्तीच्या कामावर साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. नवीन दुरुस्ती साठी दहा कोटी खर्च होणार आहे. यावर नवीनच पुल बांधला असता तर बरे झाले असते असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
राज्य परिवहन विभागाशी बोलून रोरोतून बस सेवा सुरू करा
आंबेत पुल बंद असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. पर्यायी सेवा म्हणून नदीतून रो रो सेवा सुरू आहे. अवजड वाहने रो रो मधून जात आहेत. मात्र एस टी बस नेली जात नाही. यासाठी राज्य परिवहन रायगड विभागच्या अधिकाऱ्यांशी बोलून ती सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा कमी प्रवसी संख्या बसवून बस सोडण्याबाबत प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी केल्या आहेत.