कशेळे येथे जीओडी बसवण्याच्या कामास सुरुवात
By admin | Published: July 10, 2016 12:32 AM2016-07-10T00:32:34+5:302016-07-10T00:32:34+5:30
तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी
कर्जत : तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सदर जीओडी (गँग आॅपरेटेड स्विच डीसी व्हॉल्ट)
बसविले नाही, तर वीज वितरण कार्यालयावर कशेळे ग्रामस्थांचा
मोर्चा आणू, असा इशारा उदय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे इशाऱ्याची दखल घेत कशेळे लाइनवर जीओडी बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
कशेळे ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीला पॉवर हाऊसकरिता गावातील मोक्याच्या ठिकाणी जागा दिली आहे. या ठिकाणावरून अनेक गावांना विद्युत पुरवठा करणारी लाइन गेली आहे. त्याचे वीजखांब कशेळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून टाकले आहेत. हे खांब टाकताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना
विश्वासात घेतले नाही. शेताच्या मध्यभागी वीजखांब टाकण्यात येत असल्याने शेतीची कामे करताना अडचणी येतात. त्यामुळे हे खांब शेतीच्या बांधावर टाकावे, तसेच शेतात टाकलेले खांब अन्यत्र हलवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतातील वीज खांब हटविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले. तसेच पॉवर हाऊसला जागा देत असताना कशेळे गावातील वीज मिळेल, असे आश्वासन तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते.
स्वतंत्र जीओडीमुळे वीजपुरवठा सुरळीत
- कशेळे लाइनवर वैजनाथ, हुमगावपर्यंतच्या ५० गावांचा परिसर जोडला आहे. मधल्या पट्ट्यात अनेक वेळा झाड पडल्याने किंवा इतर कारणाने तारा तुटतात आणि कशेळे परिसरात अंधार पसरतो.
- कशेळे आणि वंजारवाडी येथे एक जीओडी बसविण्याची मागणी कशेळे ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करीत आहेत; काही फॉल्ट झाला तर सर्वच गावे अंधारात न राहता काही भागात विद्युत पुरवठा सुरळीत राहील,
- वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शनिवारी जीओडी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.