एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा सुवर्णमध्य, सोमवारपासून बदली प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:08 AM2019-05-04T00:08:30+5:302019-05-04T00:09:16+5:30
आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते
कर्जत : येथील आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा भंग केल्याने कर्जत आगार व्यवस्थापकांवर विश्वास नसल्याने ऐन उन्हाच्या तडाख्यात १ मे कामगार दिनाच्या दिवशीच आम्हाला त्वरित बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी आठ कर्मचाऱ्यांनी कर्जत बस आगाराच्या बाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मागण्या मान्य झाल्यानंतर २ मे रोजी रात्री उपोषण सोडण्यात आले.
मध्यवर्ती कार्यालय मुंबई व विभागीय कार्यालय राज्य परिवहन रायगड विभाग यांनी २८कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. कर्जत आगार व्यवस्थापक यांना डिसेंबर २०१८च्या आदेशाने बदलीचे आदेश दिले असताना आज चार महिने झाले तरी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. याबाबत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना बदली झालेल्या कर्मचाºयांनी विचारले असता होळी झाल्यावर कार्यमुक्त करू असे तोंडी सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्या मर्जीतील पाच कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाणघेवाण करून बदली केल्याचा उपोषणकर्त्या कर्मचाºयांनी आरोप केला होता. ज्या पाच जणांची बदली केली होती, ती सेवाज्येष्ठता यादी डावलून केल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबतीत कर्जत व्यवस्थापकांना सेवाज्येष्ठता यादीनुसार बदली करा, आमच्याही शैक्षणिक व कौटुंबिक अडचणी आहेत, अशी विनवणी करूनही बदलीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याने केलेल्या उपोषणाच्या दुसºया दिवशी अनेकांनी उपोषणाच्या ठिकाणी भेटी दिल्या.
आठ उपोषणकर्त्यांपैकी २मे रोजी हुसेन गेडाम, उमेश चांदेकर, विनोद उईके, विनोद कनाके, विनोद आत्राम या पाच उपोषणकर्ते कर्मचारी यांना कमी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना संध्याकाळी सहा वाजता कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या उपोषणकर्त्यांच्या संपर्कात होत्या. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मोबाइलवरून संपर्क केला असता त्यांच्या सचिवांनी पेण विभागीय कार्यालयात संपर्क केला.त्यामुळे त्यांनी उपोषणकर्त्यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी विभागीय कर्मचारी अधिकारी प्रदीप जाधव यांना चर्चा करण्यासाठी पाठविले. यावेळी प्रदीप जाधव, निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, विवेक दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, अरविंद मोरे यांच्यात चर्चा झाली आणि सुवर्णमध्य निघाला. सोमवार६ मेपासून प्रत्येकी दोन असे चार चार दिवसांनी बदली झालेल्या कर्मचाºयांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात येईल असा शब्द आणि लेखी प्रदीप जाधव यांनी उपोषणकर्त्यांच्या समोर सर्वानुमते मान्य केले. त्यांना कर्जत आगार व्यवस्थापक यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. रात्री साडेदहा वाजता नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते उपोषणकर्ते राजेश आपोतीकर, गणेश चांदेकर, बाजीराव शिंदे या तिघांनी सरबत घेऊन उपोषण सोडण्यात
आले.