राबगाव /पाली : सर्वसामान्य, गरीब गरजू लाभार्थींना शिधावाटप दुकानात नियमानुसार धान्य मिळावे, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच वेळी गॅसजोडणीमधील त्रुटी दूर करून जोडणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेची सुरुवात सुधागड तहसील कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी संबंधित यंत्रणांना तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी सूचना दिल्या.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने चूलमुक्त महाराष्ट्र आणि धूरमुक्त कुटुंब निर्माण करून निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका देणे, ज्यांना धान्य मिळत नाही, अशा पात्र कुटुंबांना प्राधान्य गटाचा लाभ मिळवून देणे, नवीन गॅस कनेक्शन देणे, ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पुढील महिनाभर ही मोहीम राबवली जाणार असून त्याची सुरुवात सुधागड तहसील कार्यालयात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केली. १५ आॅगस्टपर्यंतच्या कालावधीत तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावोगावी शिबिरे भरवून १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना वेळेवर शिधावाटप दुकानात धान्य मिळण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सुधागड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमध्ये ज्यांना अद्याप गॅसजोडणी मिळाली नाही, अशा पात्र कुटुंबांना ती जोडणी दिली जाणार आहे. चूलमुक्त महाराष्ट्र आणि धूरमुक्त कुटुंब अशा स्वरूपाची मोहिमेसाठी रेशन दुकानदार, सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
प्रत्येक गावात पुरवठा विभागाच्या वतीने २१ जुलै ते २८ जुलै दरम्यान रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली जाणार आहेत. अभियानाची यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि अभियानाची सुरुवात तहसील कार्यालयात करण्यात आली. तहसीलदार रायन्नावर यांनी, चूल बंद झाली तर वृक्षतोड होणार नाही. परिणामी, नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आधी चूलमुक्त अभियान यशस्वी करण्याचा शासनाचा निर्धार आहे.